धर्म


धर्म म्हणजे आचारसंहिता! मनुष्यत्वातून ईश्वरत्वात पदार्पण करण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार व त्यांना साकारणारी व जपणारी आदर्श जीवनाची नियमावली म्हणजे धर्म! मग ती सबंध मनुष्यजातीसाठी एकच आहे. हीच धर्माविषयीची संकल्पना पूर्ण आर्यावर्तात युगानुयूगांपासून जपली गेली आहे. परंतु मागील काही हजार वर्षांपासून पृथ्वीच्या इतर भागांत वास करणा-या टोळी वा जमाती वा संप्रदाय आपल्या सत्तापिपासू, समाजविघातक वृत्तीने आर्यावर्तात येत आहेत व त्यांनीच या धर्म संकल्पनेला एक विकृत स्वरूप दिले, कि जे समाजाला ऐक्याऐवजी अनेकत्वाकडे नेते, सौख्याऐवजी दुःखाकडे नेते, आत्मसंतुष्टीऐवजी तृष्णेकडे नेते, साम्याऐवजी भेदच निर्माण करते, समाजाला पोषक न ठरता समाजविघातकच ठरते.
मग धर्म म्हणजे तरी काय? समाजात असा संभ्रम मांडलेला असता आपण कोणते मत स्विकारावे?
कोणतेही प्रमाण ग्राह्य धरायचे नाही असे ठरवले, तरी सामान्य बुद्धीलाही धर्म सहजच समजतो. गरज आहे ती फक्त आपला अहंकार बाजूला ठेऊन उघड्या डोळ्यांनी सत्य पहायची! सत्य उघड आहे, स्पष्ट आहे. सर्व मनुष्य अंतर्बाह्य सारखे आहेत, त्यांची सुखाची भावना, दुःखाची वेदना, प्रेमाची गोडी एवढेच नव्हे तर राग, अश्रू सारे सारे काही सारखेच आहेत. मग असे असता भारतात राहणा-याचा धर्म वेगळा आणि अमेरिकेत राहणा-यांचा धर्म वेगळा, इराक-इराण मध्ये राहणा-यांचा धर्म त्याहून वेगळा असे कसे होईल? भारतातील देवाने भारत देश बनवला व तो येथील लोकांचे रक्षण करतो व इंग्लंडमधील देवाने इंग्लंड बनवला व तो तेथील प्रजेचा प्रतिपाळ करतो व इतरांना दंड देतो असे कसे होईल? स्थल-काल परत्वे रूढी-परंपरा भिन्न असू शकतात, पण धर्म म्हणजे रूढी-परंपरा मूळीच नाही. प्रत्येक जीवमात्र सर्वांना सारखाच पूज्य आहे. असे असता एक गाय अपवित्र मानून मारतो, तर दुसरा तिला पूजतो. एक बकरी कापतो, तर एक तिला घरात बांधतो. म्हणून रूढी-परंपरा कधी धर्म असू शकत नाही. त्या तर समाजातील काही लोकांनी डोळे झाकून पाळलेल्या शुभ-अशुभ रिती आहेत, धर्म नाही.
धर्म हे ईश्वराने बनवलेले मानवासाठीचे नियम आहेत. झाडासाठी ज्याने फुलण्याचा-बहरण्याचा नियम निश्चित केला, पाण्यासाठी ज्याने सर्वांना जीवन देण्याचा धर्म निश्चित केला, प्राण्यांसाठी त्यांचे त्यांचे स्वभावधर्म ज्याने निश्चित केले, त्याच निसर्गाने मनुष्यासाठी धर्म निश्चित केला. तो धर्म म्हणजे सेवा, तो धर्म म्हणजे त्याग, तो धर्म म्हणजे प्रेम! एवढेच नाही तर सज्जनांचे रक्षण, दुष्टांना दंडण, समाजकंटकांचे उच्छेदन हाच धर्म आहे. धर्म याहूनही व्यापक आहे. मनुष्याच्या प्रत्येक कृतीविषयी आहे. धर्म सर्वांसाठी समान आहे, पण तरी धर्म्य क्रिया मात्र बदलू शकतात. धर्म्य क्रिया व्यक्तीच्या गुणानुरूप बदलतात, देश-काल-स्थलपरत्वे बदलतात. या धर्म्य क्रियाच समाजाला धरून ठेवतात. ‘घटयतु चैक कुटुम्बमयम्।’ ही भावना जोपासतात. म्हणूनच धर्म हा समाजाची धारणा करणारा असतो ना की विभाजन करणारा ! ज्या ज्या कृतीने समाजाची उभारणी होईल व सामाजिक बांधिलकी टिकून राहील, समाजात विकास-उन्नतीची प्रवृत्ती वाढेल, समाज या संकल्पनेची मर्यादा विस्तारून विश्व ही समाजाची मर्यादा होईल ती ती कृती धर्म्य समजावी. त्याव्यतिरिक्त अन्य सर्व क्रिया अधर्म्य ठरतात.

No comments:

Post a Comment