Saturday 21 December 2013

सिंधुस्थानच्या आधुनिक इतिहासातील सहा सोनेरी पाने


'सिंधुस्थान' म्हणून भरतभूमीचा उल्लेख आता-आताच्या भविष्यपुराणातही आलेला आढळतो.


"एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
विक्रमादित्य पौत्रश्च पितृराज्य प्रपेदिरे|
जित्वा शकान् दुराधर्षान् चीनतैत्तिरीदेशजान् |
बाल्हिकान् कामरूपांश्च रोमजान्खुरजान् शठान्|
तेषाम् कोषान् गृहित्वा च दंड योग्यानकारयत् |
स्थापिता तेन मर्यादा म्लेंच्छाणीया पृथक पृथक | 
म्लेंच्छस्थानम् परं सींधो कृतम् तेन महात्मना |"
-भविष्यपुराण


याचाच अर्थ कि १०००-२००० वर्षांपूर्वीपर्यंत आपण 'सिंधू'/'सिंधुस्थानी' म्हणूनच ओळखले जात होतो. म्हणून हिंदू ही संज्ञा त्या सर्वांना लागू होते ज्यांचा जन्म भारतातील आहे- 'तं वर्षं भारतं नाम भारती यत्र संततीः|' जो कोणी स्वतःला या माता भारती चा पुत्र समजतो तो तो हिंदू आहे. हीच पवित्र, जाणीव आजवर या सिंधुस्थानाला एकत्र बांधून आहे व याच विचारसरणीला धरूनच आपल्याला आपले स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या, जाचक परकिय आक्रमणांपासून निभावून नेता येईल अन्यथा नाही.


जसा देव, तसाच देश! जसा धर्म, तसेच राज्य! स्वराज्य स्थापन केल्याशिवाय काही आपल्याला निश्चिंतपणे स्वधर्माचे पालन करता येणार नाही. म्हणून राज्य हे स्वराज्यच असावे, हेच आपले वेद सांगतात, आपली पुराणे हाच इतिहास टाहो फोडून गातात, हाच ऐश्वर्ययोग आपल्याला शास्त्रांमधून शिकवला आहे.


सिंधुस्थानाचा इतिहास चाळला तर असा विचार येतो की कदाचित हिंदूंची एकराष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ होण्यासाठीच की काय परचक्र सिंधुस्थानाच्या उत्तर दरवाजावर घोंघावू लागले. एकदा, दोनदा नाही तर शेकडो वेळा म्लेंछांनी म्हणजे परकियांनी भारतावर ले व प्रत्येक पराभवानंतर ही सिंधुभूमी पुनःश्च पूर्वीपेक्षा अपमाने प्रतिकारासाठी सज्ज होऊन उभी राहिली. हाच सोनेरी इतिहास आपण थोडक्यात पाहू.


सोनेरी? होय, सुवर्णमयी इतिहास ! इंग्रजांच्या कृपाशिर्वादामूळे आपल्यापैकी कित्येक हिंदू आपला सुवर्ण इतिहास विसरले, परंतु तो खऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांनी तो आपल्या हृदयात कोरून ठेवला आहे. बलाढ्य मेसेडोनियन आक्रमणकर्ता अलेक्झांडरला त्याच्या सैन्यासह चित केले ते एका चंद्रगुप्त-चाणक्य या गुरूशिष्यांच्या जोडीने ! हे आपल्या अर्वाचीन इतिहासातील पहिले सोनेरी पान ! पुढे अशोकाने बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर भारतात नपुंसकता वाढीस लागली हे पाहून यवनांनी पुनःश्च आक्रमण केले , तेव्हा सिंधुस्थानातील अन्य हिंदू राजांचे समर्थन मिळवून, नपुंसक मगधेश अशोकपुत्राचा वध करून, मगधाचा राज्यकारभार आपल्या विवेकी, संयमी, तेजस्वी हातात घेऊन आततायी यवनांना मगधापर्यंत अडवून धरणारा आमचा हिंदू मगधसम्राट पुष्यमित्र ! पुढे शक-कुशाणांच्या टोळीच्या टोळी रानटी टोळधाडींप्रमाधे उत्तरेत हिंदवी रक्ताची होळी खेळू लागल्या, तेव्हा त्यांनादेखील दंडकारण्यापर्यंत पोचण्यापासून थोपवून धरले ते आपल्या पाटलीपूत्रातील गुप्त वंशाच्या सम्राट दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच सम्राट विक्रमादित्य याने ! हा शक-हूणांच्या मर्दनाचा इतिहास म्हणजे आपल्या इतिहासातील तिसरे सोनेरी पान ! पुढे पुन्हा कित्येक वर्षे शांततेचा उपभोग घेतल्यानंतर एकाएकी शक-कुशाणांप्रमाणेच रानटी, क्रूर हूणांच्या धाडीवर धाडी आर्यांच्या पवित्र प्रदेशात मुसंडी मारू लागल्या. उत्तरेचा बहुत भाग या हूणांनी व्यापल्यावर भारतभूमीचा कोणी वाली राहिला नाही अशी अवस्था बनल्यावर या सिंधू रक्षणार्थ धावला तो मालव प्रांताचा हिंदू राजा यशोधर्मा ! अन्य हिंदू राजांच्या सहमतीने त्यांचे नेतृत्व स्विकारून सम्राट यशोधर्म्याने हूणांचा नायनाट केला. हे होते आपल्या इतिहासाचे चवथे सोनेरी पान !


पुढील पाचवे सोनेरी पान फार प्रदिर्घ असून आत्मसंरक्षणासाठी दिलेल्या झुंजीची एक महान गाथाच आहे. या यज्ञात कितीतरी आहुती दिल्या गेल्या, जितक्या आहुती दिल्या गेल्या तितक्याच  हिंदूराष्ट्रभक्तांच्या पवित्र रक्ताचे हविर्द्रव्य यात समर्पित झाले. परंतु अंततोगत्वा हा यज्ञ 'हिंदूपदपादशाही'चे व्रत घेतलेल्या दिक्षित मराठा ब्राह्मणांकरवी पूर्ण झाला. होय आम्ही त्या अरबी, पठाणी, इराणी, मुघल, तुर्की, निजामी मुसलमानांशी आपल्या पूर्वजांनी केलेल्या धार्मिक युद्धाचीच गोष्ट करत आहोत. या सिंधूराष्ट्राला तपश्चर्येच्या अग्नीत नियतीने झोकून देऊन प्रथम आहुती स्विकारली ती सिंध प्रांतातील राजा दाहिर याच्या हस्ते ! त्यानंतर राजा जयपाल-अनंगपाल, पुढे सोमनाथावर जेव्हा धर्मांध आक्रमणे झाली, तेव्हा तर सबंध गुजरात-सौराष्ट्रातील हजारो-लाखो हिंदू वीरांनी स्वतःला या पवित्र यज्ञात हविर्द्रव्य म्हणून समर्पित केले की जेणेकरून यज्ञातील देशभक्तिरूपी अग्नीपुरूष अधिक प्रज्वलित झाला. पुढे पृथ्वीराज चौहान या रजपूत राजाने मोहम्मद घोरी व त्याच्या सैन्याच्या अनेकदा दिलेल्या आहुत्या, पुढे चित्तोडची राणी करुणादेवी, देवगिरीचा राजा रामदेवराय, रतनभोरचे रजपूत राजे, चित्तोडची राणी पद्मिनी यांनी अल्लाउद्दीन खिलजीविरुद्ध झुंजत स्वतः अर्घ्य होऊन या यज्ञात आत्मार्पण केले, कालांतराने मूळ हिंदू असलेले नसिरुद्दिन व देवलदेवी यांनी तर २ वर्षासाठी का होईना पण हिंदू राजवट पून्हा स्थापन केली पण इतर हिंदू राजांच्या राजद्रोहामुळे हा यज्ञ अपूर्ण राहिला आणि या धर्मरक्षकांनी आपल्या  तेजाचे हविर्द्रव्य स्वातंत्र्याच्या पवित्र यज्ञात अर्पिले,  पूढे रजपूत राजे राणा कुंभ, राणा संग, राणा उदयसिंग, महाराणा प्रताप यांनी प्रयत्नांची शिकस्त करून हिंदुत्वाचा यज्ञाग्नी आपल्या हविर्द्रव्याने नित्य तेवत ठेवला. त्याच समयी विजयनगरमध्ये नृसिंहोपासक हरिहर-बुक्क यांनी बळकट हिंदवी राज्य स्थापले. याच विजयनगरने पुढे राजा कृष्णदेवराय, राजा रामराय सारखे वीरोत्तम, धर्मधुरंधर जन्माला घातले, त्यांनी प्राणज्योत मालवेस्तोवर कितीतरी मुसंड्यांच्या आहुत्या देत यज्ञाग्नी धगधगता ठेवला. पुढे दख्खनच्या पवित्र भूमीत जेथे राजा राममदेवरायाच्या कालावधीपासून सतत संतांची मांदियाळी अवतरत राहिली, त्याच धर्मभूमीमध्ये राजा शिवाजी साक्षात शिवाचा सजीव पुतळा अवतरित झाला. 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' हे भगवत वचन सार्थ करण्यासाठी! निजामशाही, कुतुबशाही, दिल्लीचे मुघल यांना शिवाजी व शिवाजीनंतर महराष्ट्राचे पंतप्रधान थोरले बाजीराव, माधवराव, नाना-भाऊ पेशवे यांनी व यांच्या अनेकोनेक मातब्बर मराठीसरदारांनी जेरीस आणले व नाममात्र सुलतान बनवून ठेवले. पुनः हिंदवी स्वराज्य स्थापले ते अगदी अटकेपर्यंत ! समकालीन रजपूत राजा छत्रसाल यानेही या यज्ञात कित्येक आहुत्या देत व स्वतःचे रक्त हविर्द्रव्य म्हणून अर्पून आपले योगदान दिले. हे होते ते इतिहासाचे प्रदिर्घ पाचवे सोनेरी पान ! यानंतर सिंधुस्थानाला सामना करावा लागला तो इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगाल राजवटींचा! खरंच वाटते भगंवताला सबंध भारतवासीयांचीच परिक्षा घ्यावयाची होती की काय, म्हणून स्वातंत्र्याच्या यज्ञात कित्येक राजांनी हविर्द्रव्य अर्पिले असूनही यज्ञदेवता प्रसन्न झाली नाही, त्यासाठी प्रत्येक हिंदूकडून आहुत्या व स्वतःचे प्राणार्पण अपेक्षित होते. इंग्रज आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या या संघर्षात प्रत्येक भारतीय रजपूत योद्धा होऊन तर कधी प्रत्यक्ष भगवान नृसिंह होऊन लढला आणि अडिचशे वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर भरतभूमीने मुक्तीचा सूर्य पाहिला. हे होते हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासातले सहावे सोनरी पान !


आपण पाहिलेत , कसे एका राष्ट्रियत्वाच्या भावनेने आपले भिन्न-भिन्न जाती-धर्माचे, वंशाचे, घराण्याचे पूर्वज एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेने जगले आणि दुसऱ्या बांधवांचे दुःख कमी व्हावे म्हणून नेहमी स्वतः लढून एकतर शत्रूचा बळी घेतला किंवा स्वतः स्वातंत्र्याच्या प्रज्वलित अग्नीत उडी घेतली. हे सारे घडले ते केवळ 'हिंदुइझम्' या एका शब्दाने अभिप्रेत होणाऱ्या हिंदू वैदिक धर्मासाठी नव्हे, तर हिंदुस्थानच्या संस्कृतीचे ऐक्य, सुखी नागरी जीवन अखंड टिकवून ठेवता यावे यासाठी, हिंदुस्थानचे वैभव, मान-मर्यादा तशीच टिकून रहावी याकरता ! अहो जो या मातीला आपली आई मानत नाही तो काय अभय देणार येथील संस्कृतीला, येथील प्रजेला ! जेथे आत्मीयता नाही, तेथे लुटालूटचीच भावना उत्पन्न होणार व बळावणार ! म्हणूनच जो जो या भारती मातेला आपली जननी मानून या मातेसाठी व तिच्या निरागस पौत्रांसाठीतळमळतो, तो हिंदू! हा आमचा बाणा म्हणजे हिंदुत्व ! भारतात राहून तालिबानशी आपलेपणा म्हणजे मानवतेशी शत्रूता बाळगणाऱ्याला आम्ही हिंदू म्हणवून घेणार नाही, भले तो कोणत्याही जाती, धर्म, वंश , घराण्याचा का असेना !

संदर्भ ग्रंथ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व आणि सहा सोनेरी पाने

Saturday 7 December 2013

एकच ध्येय, एकच राष्ट्र आणि एकच नियम


मागील लेखात आपण हिंदुत्व आणि हिंदू धर्म या संकल्पनांमधील अंतर पाहिले. आज आपण आर्यांची हिंदुत्वाची संकल्पना विस्ताराने पाहू. हिंदुत्वाचे वैशिष्ट्य तिच्या उदयाच्या पवित्र प्रयोजनातच दडलेले आहे आणि ते पवित्र प्रयोजन म्हणजे 'एकच राष्ट्र, एकच ध्येय, एकच नियम!


कोणतीही संस्कृती उदयास येण्यापूर्वीच हे आर्य सिंधू नदिच्या खोऱ्यात वसाहत करून रहात होते. ते कोठून आले, केव्हा आले या प्रश्नांपेक्षाही या सत्याला महत्त्व आहे की त्यांनी सबंध जगापासून दूर असलेल्या या भूखंडालाच आपलेसे मानले व येथेच त्यांनी आपला यज्ञाग्नी प्रज्वलित करून येथील शांत वातावरणात आत्मोद्धाराचा अभ्यास सुरू केला. अतुल्य सामर्थ्य, अपरिमित बुद्धिमत्ता व अचाट आत्मशक्तीच्या बळावर आर्यांनी परब्रह्माला आपलेसे केले. या संपूर्ण वैभलाचा उपयोग त्यांनी एक अशी संस्कृती उभारण्यास केला की ज्या संस्कृतीसाठी लौकिक व पारलौकिक उद्धाराशिवाय जगण्याचा दुसरा हेतूच नाही. आर्यांची हा निर्णय कोणी एकट्याने केलेला नव्हता तर ते मूळातच एकाच ध्येयाने, एकाच आत्मप्रेरणेने प्रेरित झालेले असल्याने सर्वांनी एकमताने एक राष्ट्र, एक व्यक्ती व एकच नियमाचे अनुशासन अवलंबिण्याचा निर्णय घेतला.


एकाच देहाच्या अवयवांमध्ये जे सहज प्रेम असते, कारण अवयव वेगवेगळे असलेतरी जीव एकच असतो. याच तत्त्वावर आधारित ही संस्कृती आहे. एक संयुक्त राष्ट्र, एक संयुक्त समाजपुरूष आणि एकच संयुक्त नियम हेच हिंदुस्थानीना वर्षानुवर्षे एका सूत्रात बांधून आहे. या एकाच ध्येयायाठी आपले पूर्वज जीवन जगले व याच ध्येयासाठी आपण जीवन जगणे श्रेयस आहे. का? तर हाच परमात्याचाच संकल्प आहे,'मी एक आहे, मी अनेक रूपांत प्रकट व्हावे'. पहा हा एकजीवत्वाचा व अनेक होऊन एकच कार्य उभारण्याचा संकल्प देवाचाच आहे. शिवाय इतिहास चाळला तर हेच समजते की याच मार्गाने प्रशस्त जीवन जगता येते आणि सर्वांना हितकर हाच एक मार्ग आहे. याच एका ध्येयामुळे विभिन्न संप्रदायही एकाच देेशात गुण्यागोविंदाने नांदू शकतात. पण ध्येयच जर एक नसेल तर संप्रदाय एक असूनही एकत्र राहता येत नाही याला इतिहास साक्षी आहे.


अखंड समाजाला एकजीवित्वाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी हिंदुत्वात मोडतात. पण हे एकजीवित्व काही बळाने साकारता येत नाही. काही संप्रदाय अन्य धर्मीयांच्या जीवावरच उठलेले आहेत. 'धर्म बदल नाही तर मरणाला सामोरं जा', असा पवित्रा घेऊन जगात अराजकता पसरवत आहेत. पण त्यांना हे ठाऊकच नाही कि दोन देहांत राहूनही एकजीव होता येतं की आणि दोन वेगवेगळ्या रूढी - परंपरांच्या पार्श्वभूमीवरदेखील एकजीवत्व टिकवता येते. गरज असते ती एका ध्येयाची. इतिहास साक्षी आहे की काळाच्या ओघात याच संस्कृतीनेे अत्यंत बिकट अवस्थेतही तग धरून राहण्याचे कौशल्य दाखवलेले आहे. त्याचे कारण या हिंदुत्वाच्या एकराष्ट्रियत्वाच्या, एकजीवित्वाच्या तत्त्वांमध्येच आहे. हे हिंदुत्व जोपासणं हेच आपले परमध्येय आहे.


जय श्रीराम|

जय मॉ भारती|

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

हिंदूंचे आंतरराष्ट्रीय जीवन


हिंदू राष्ट्र फार पूर्वीपासून विश्वपटलावर एका दैदिप्यमानसूर्याप्रमाणे आत्मतेजाने तळपत होते. भूमार्गे, समुद्रमार्गे दूरदूरच्या देशांबरोबर देवाण-घेवाणीचे व्यवहार सुरू होते. इजिप्तसारख्या राष्ट्रामध्ये फार अलीकडच्या काळापर्यंत चांगल्या कापडाला सिंधू म्हणून ओळखले जात असे. कारण लक्षात येते की आपल्या देशातून फार पूर्वीपासून चांगले कापड बाहेर निर्यात होत असे. जूना पत्रव्यवहार पाहिला तर लक्षात येते कि फार पूर्वीपासून आपल्या देशाला ‘सिंधू’, ‘हिंदू’, ‘इंडस्’, ‘शिन्सू’ असे संबोधले जात असे. काही आंतरराष्ट्रीय मतभेदही होते. पण ते मतभेद कधी दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याइतपत टोकाला गेले नव्हते. सहिष्णूता सहजच सर्वांच्या ठायी होती. कोठवर?  बौद्ध धर्माच्या उदयापर्यंतच! नंतर परिस्थिती टोकाला गेली. म्हणूनच हिंदूंच्या आंतरराष्ट्रीय जीवनाचा विचार करताना बौद्ध धर्माची या देशाच्या इतिहासातील भूमिका यावर विचार करणे आवश्यक ठरते. कित्येक इतिहासकारांनी यावर आपली मते मांडली आहेत. आपण येथे पाहू कि सावरकर या विषयावर आपल्याला काय सांगत आहेत.


बौद्धधर्माच्या उदयानंतर बौद्ध भिक्षूंच्या यात्रा सतत अन्य देशांमध्ये होत असत. त्यांची विद्वत्ता, वैराग्याचे विचार, अहिंसा व विश्वबंधुत्वसारख्या उदार मतांचे अवलंबन यामुळे हा धर्म सहजच जगाचे आकर्षणकेंद्र बनला. सहजच बौद्ध धर्मापाठोपाठ हिंदूराष्ट्रही सर्वांच्या कौतुकाचे केंद्र बनले. म्हणूनच असे म्हणता येते की बौद्ध धर्म कळत-नकळत आपल्या हिंदूराष्ट्राला जगात एक आकर्षणबिंदू बनवण्यास कारणीभूत ठरला. असो. पण बौद्ध धर्माच्या विश्वबंधुत्वाचा फायदा ज्ञानी, गरजू व विवेकी लोकांना होण्याऐवजी  अज्ञानी, आळशी व स्वार्थी लोकांनाच झाला; कारण त्याकाळी बौद्ध धर्माची दिक्षा घेऊन भिक्षू झाल्यास तशा लोकांना बौद्ध विहारांतून, मठांतून मोफत राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय करून दिली जात असे. साहजिकच कर्माला अशाने गौणत्व येऊन अनाचार, कर्मशून्यतेची वृत्ती सर्व बौद्ध भिक्षूंमध्ये पसरली. याशिवाय अशी मोफत खाण्या-पिण्याची व राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अर्थातच बौद्धभिक्षू राजाश्रय शोधत असत व जेथे राजा अशा अनाचाराला प्रोत्साहन व समर्थन देईल तेथे ते मठ-विहार बांधून राजावर सर्व भार टाकून देत असत. साहजिकच वैदिक संस्कारात वाढलेल्या बहुसंख्य राजांना हे कालांतराने अशक्य आणि अव्यवहारिक आहे याची जाणीव झाली व त्यांनी बौद्ध धर्माला दिलेला पाठिंबा काढून घेतला. हेच कारण झाले बौद्ध भिक्षूंच्या मनात हिंदू राजांविषयी अनास्था निर्माण होण्याचे.


गोष्ट एवढ्यावरच संपली असती व कर्मशून्य झालेल्या बौद्ध भिक्षूंनी आपल्यास अनुकूल प्रदेश शोधला असता तरी भागले असते; परंतु तसे झाले नाही. त्याउलट बौद्ध भिक्षूंनी पूढे झालेल्या परकिय आक्रमणांमध्ये हिंदू राष्ट्राशी दगा करून परकिय आक्रमकांना समर्थन दिले. कशासाठी? तर केवळ राजाश्रय मिळावा आणि असहकार करणाऱ्या हिंदू राष्ट्रांना अद्दल घडवावी म्हणून! पण परिणाम काय झाला? हिंदू राष्ट्रांवर २००० वर्षांपर्यंत भरून न निघणारे संकट ओढवले. एवढेच नाही तर परकिय राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणांमध्ये हिंदूस्थानी वैदिक समाजापेक्षाही बौद्ध भिक्षूंची निर्दयी कत्तल केली. जे हिंदू बौद्ध राष्ट्रे होती त्यांची काय दशा झाली? बौद्ध धर्मातील अहिंसा तत्त्वाचा नीट अर्थ न समजता विपरीत अर्थ लावल्याने ती राष्ट्रे युद्धाशिवायच परकिय राष्ट्रांच्या पाशवी आक्रमणांत नामशेष झाली. यामुळेच बौद्धांनी जाणलेले आणि आत्मसात केलेले अहिंसेचे तत्त्वज्ञान किती पोकळ आहे हे सगळ्यांना समजून चुकले. नरभक्षी वाघासमोर काय अहिंसा दाखवणार? माणसाने कमीत कमी दुसऱ्या माणसाशी तरी माणसाप्रमाणे वागावे ही साधी समज ज्यांच्या वंशात कोणालाच नव्हती, त्यांना कोणत्या अहिंसेने खूष ठेवता येईल? हे न समजून घेता सत्ता कोणाचीही असो पण आमच्याच धर्माला राजाश्रय मिळायला हवा, असा निराधार आणि अव्यवहारिक हट्ट या बौद्ध भिक्षूंनी धरला, त्यामुळे बौद्ध धर्माची विश्वव्यापक उदार तत्त्वे बाजूलाच राहून या धर्माचे अनुयायी हिंदूमत्सरी, हिंदूराष्ट्रद्रोही, आततायी, सुखलोलुप, ज्ञानविहिन बनते झाले.


वर सांगितलेल्या व याहूनही अन्य बहुत कारणामुळे बौद्ध धर्माचे मूळ शांतीचे तत्त्व बाजूला राहून हा धर्म हिंदूस्थानातील जनमानसातून लोप पावू लागला. खरे तर आजही बौद्धांना हिंदू राष्ट्रांत भय मानण्याचे व परकियांना आमंत्रित करण्याचे आत्महननी कार्य न करता हिंदूंच्या सहिष्णूतेच्या वृक्षातळी निवांत आपला निर्वाणाचा अभ्यास करायला हरकत नाही. पण आसक्ती जशी कालांतराने वृत्ती बनते , तशी हिंदूराष्ट्रातील लोक असहिष्णू आहेत अशी ओरड करण्याची या लोकांची वृत्तीच बनली आहे. द्रोह स्वकियांनी केला तर तो स्वकिय आपण परकियच समजतो. भिन्न भिन्न राष्ट्रे शेजारी शेजारी गुण्या-गोविंदाने नांदू शकतात हे आशिया खंडातील अतिप्राचीन संस्कृतींनी दाखवून दिले आहे. शिवाय राजाश्रयाचा हव्यास न धरताही विभिन्न संस्कृती एकाच राष्ट्रात नांदू शकतात, हे हिंदूस्थानातच घडले आहे. पण मूळातच संबंध ईर्षा, स्वार्थ, मत्सराने लिप्त असेल तर द्रोह ही सहज प्रवृत्ती होते, हे इतिहासावरून ध्यानात येते.


आंतरराष्ट्रीय व्यवहारात नेहमी अग्रेसर असणारा हिंदू उत्तरेला अटक आणि दक्षिणेला समुद्र यांच्या मर्यादेत कसा सापडला? त्याला जबाबदार ठरली मुस्लिम व इंग्रज, तुर्की, पोर्तुगीजांची धर्माक्रमणे! ग्रीक, हूण, शक-कुशाण यांची आक्रमणे आणि तदनंतर झालेली म्लेंछ मुसलमान व पाश्चात्यांची आक्रमणे यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे मुसलमान आणि इंग्रजादि पाश्चात्यांनी हिंदुस्थानातील प्रजेचे बलात्काराने धर्मपरिवर्तन केले. धर्मपरिवर्तन हे असे अस्त्र मुसलमान आणि इंग्रजांनी वापरले कि ज्यामुळे त्यांचा सामना करणे दुष्कर होऊन बसले व वाळवी लागलेल्या लाकडाप्रमाणे भरतभूमी आतून पोखरून निघू लागली. धर्मपरिवर्तन हे श्रद्धापरिवर्तन, आस्थापरिवर्तन आणि मातृभूमीपरिवर्तन ठरते, म्हणूनच ते आधिक घातकी ठरते. हिंदूंचे होणारे सततचे बलात्कारित धर्मपरिवर्तन थांबवण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी धर्मदंडाचा वापर केला, कारण अटकेपलीकडचा प्रदेश हा मुसलमानव्याप्त झाला होता आणि भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश इंग्रजादि पाश्चात्यांनी व्यापलेला होता. याची जाणीव न ठेवता तथाकथित सुशिक्षितांनी तत्कालीन धर्मरक्षकांवर धर्मांधतेचा आरोप लावून मनुस्मृती सारखा पवित्र ग्रंथ जाळण्याचे लाजिरवाणे कृत्य केले. असो! कर्मगती त्यांना योग्य ते उत्तर देईलच. बौद्ध कालापासून सुरू झालेल्या आक्रमणांचा व त्याविरुद्ध दिलेल्या झुंजीचा हा हिंदुत्वाच्या विजयाने झगमगणारा सोनेरी इतिहास वारंवार लिहावाव वारंवार गावा असाच आहे. असा आपला तेजस्वी इतिहास आपण पुढिल लेखात पाहू. तोवर जय श्रीराम |

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'