अध्यात्माची वैदिक परंपरा


चराचराचा जो सूत्रधार तोच त्याचा निर्माता व संहारकर्ता आहे. स्वतः स्वतःमध्ये व स्वतःपासूनच सृष्टी निर्माण करून त्याहून नामानिराळा न राहता त्या सृष्टीचे सूत्रधारपणही त्याने स्विकारले. सृष्टी निर्माण करण्यामागचा त्याचा जो संकल्प तोच सर्व सृष्टीचा धर्म झाला.

काय होता तो संकल्प?

‘एकोऽहम् बहुस्याम्।’ – ‘आपणच अनेकत्वात नटावे आणि अनेक राहूनही ऐक्याने आदर्श जीवनाचाच खेळ खेळावा.’ देवच हे जग बनला, तोच या जगातील सचेतन व अचेतन जीव, वस्तू बनला. पण आता मात्र मायेच्या मर्यादेत आल्यामूळे त्या कोणत्याही वस्तूमध्ये, जीवांमध्ये आता ईश्वर दिसत नाही. अशा या मायेच्या मर्यादांमध्ये असलेल्या वस्तूंपैकी केवळ जीव या प्रकृतीलाच स्वस्वरूप जाणण्याचे सामर्थ्य ईश्वरी सत्तेनेच प्राप्त झाले आहे. या जीवांना ज्ञानाच्या बळावर अद्वैतस्थिती, स्वरूपस्थिती म्हणजेच ईश्वरत्व प्राप्त करता येते. नव्हे नव्हे तर यासाठीच सचेतनांचे प्रयोजन आहे.
लक्षात घ्या. जसा देव अनादी आहे ना, तसा हा संकल्पदेखील अनादीच आहे.

मग काय आहे या चराचराचा धर्म?
अनेक रूपात राहूनही ऐक्यच प्रस्थापित करणे हा त्या परमात्म्याचा संकल्प. ऐक्य कुणाशी? तर अर्थातच परमात्म्याशी! म्हणून आपल्या जीवनात आपण भले कोणी का असेना राजा-रंक-धोबी-कारागीर-वैद्य-धंदेवाईक इ., पण तरी आपण जेथे आहोत तेथेच राहून भगवंताचा संकल्प पूर्ण करावा आणि त्याच्याशी ऐक्य घडवून आणावे. हाच सर्वांचा आद्य धर्म झाला.
पाण्याने प्रवाहित रहावे, वा-याने वाहात रहावे, सूर्याने तळपत रहावे, मेघाने वर्षत रहावे, सोन्याने चमकावे, चांदीने चकाकावे, अग्नीने भस्म करावे हे ज्याचे त्याचे धर्म त्या निर्मात्याने निश्चित करून ठेवले आहेत. मनुष्य म्हणून आपलाही काही धर्म आहे. आपल्या जन्माच्याच काय पण सृष्टिउत्पत्तीच्या अगोदरच सुनिश्चित झालेला आहे. तो धर्म म्हणजे हे अनेकत्व ओलांडून ऐक्यसूखात सामावून जाणे आणि या मनुष्य देहाच्या अस्तित्वाच्या परमध्येयापर्यंत जाऊन पोचण्यासाठी सर्वांना सहाय्य करणे. अशा प्रकारे तो परमात्म्याचा संकल्पच आपला धर्म बनला.

अधिक विस्ताराने धर्म सांगायचा झाला तर असा सांगता येईल-
आपण मनुष्य प्राण्यांमध्ये राहतो, तेव्हा आपल्या सहवासात येणा-या प्रत्येकासंबंधात असणारी आपली वागणूक ही त्याच्या पारलौकिक कल्याणास पोषक ठरावी. हा सर्व मनुष्यमात्रांच्या ठिकाणी वास करणा-या भगवंताचा संकल्प आपला धर्म बनला. आपल्याला धर्माचे पालन करता यावे, यासाठी सहाय्यक सृष्टी आहे, तेव्हा त्या सृष्टिचाही यथोचित लाभ आपण घ्यावा, सृष्टिचक्रातील आपली भूमिका ध्यानात घेऊन तीच निभवावी हा त्या सृष्टितील परमेश्वराचा संकल्प आपला धर्म बनला.
पारतंत्र्याच्या विळख्यातून भारतभूला सोडवावे हा त्या भारतभूमीतील ईश्वराचा संकल्प आपला धर्म बनला. शासनकर्त्याने आपल्या नगरामध्ये शांतता, सुव्यवस्था राखावी हा त्या नगरातील ईश्वराचा संकल्प हा शासकाचा धर्म बनतो. आपण जेथे पोटापाण्यासाठी व्यवसाय करतो, अथवा आपण जे जे काही कर्म करतो तेव्हा ते ते कर्म शास्त्रोक्त पद्धतीने पुण्यप्रद होईल असेच घडावे, हा त्या कर्मातील ईश्वराचा हेतू आपला धर्म बनतो.

हा धर्म म्हणजेच आपल्यासंबंधाने असलेला ईश्वराचा संकल्प कोणी बरे सांगितला?
या विश्वाच्या सूत्रधाराने म्हणजेच परमेश्वराने सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करता येण्यासाठी आपला स्वधर्म आधी जाणता यावा यासाठी एक विशिष्ट व्यवस्था करून ठेवली आहे. ती अशी की, परमेश्वर स्वतः ऋषीमुनींच्या रूपात पूर्वी अवतरीत झाला व आपल्याच सामर्थ्याने निर्गुण परमात्म्याला प्रसन्न करून सर्वांच्या उद्धाराचा मार्ग त्याच्याकडून जाणून घेतला. तेव्हा परमात्म्याच्या अलौकिक वाणीतून मनुष्याच्या उद्धाराचे जे वचन बाहेर पडले, तेच वेद होय. तत्कालीन स्वरूपारूढ ऋषीमुनींनी ते वेद कंठस्थ केले व वेद ग्रहण करण्यास पात्र असलेल्या आपल्या सर्वोत्तम शिष्यांना ते शिकवले. तसेच त्यांना ते ज्ञान याच गुरूशिष्य परंपरेने जतन करावयास सांगितले.
हेच वेद सत्याला प्रमाण आहेत. तेच आचरण्याजोगते आहेत. कारण त्यांची उत्पत्ती व जतन हे स्वतः परमात्म्याच्या सगुण रूपाने अवतरीत होऊन केले आहे. हीच अध्यात्म जपणारी वैदिक, वैभवशाली, सनातन हिंदू परंपरा आहे. अहो! जो संकल्पच मूळात परमात्म्याचा आहे व ज्या संकल्पाचा वाहकच मूळात स्वयं परमात्मा आहे, तो संकल्प म्हणजे वेद की जे देहादेहात अध्यात्माची गुढी उभारतात, त्यांची महती काय बरे वर्णावी! परमेश्वरच शब्दरूपात वेद होऊन प्रकटला, इतकेच सांगता येते!

मनुष्याचा जगण्याचा नियम म्हणजे वेद! जीवनाची मंगल सूत्रे ज्यात गुंफलेली आहेत तो सर्व सूत्रांमध्ये एकत्वाने व्यापून असणारा धागा म्हणजे वेद! अध्यात्माला स्वभावात परिणत करणे हाच ज्याचा हेतू आहे ते वेद! मंगलमय, कौटुंबिक, सामाजिक व परिणामी राष्ट्रिय जीवनाचा पाया म्हणजे वेद! अशी ही वेदांवर आधारित, वेदोक्त वचनांनीच पोसली गेलेली, वेदज्ञ महापुरूषांनीच जतन केलेली आपली आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती! अध्यात्माचे दुसरे नावच जणू! आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीचा विजय असो!

No comments:

Post a Comment