Saturday, 7 December 2013

हिंदूंचे आंतरराष्ट्रीय जीवन


हिंदू राष्ट्र फार पूर्वीपासून विश्वपटलावर एका दैदिप्यमानसूर्याप्रमाणे आत्मतेजाने तळपत होते. भूमार्गे, समुद्रमार्गे दूरदूरच्या देशांबरोबर देवाण-घेवाणीचे व्यवहार सुरू होते. इजिप्तसारख्या राष्ट्रामध्ये फार अलीकडच्या काळापर्यंत चांगल्या कापडाला सिंधू म्हणून ओळखले जात असे. कारण लक्षात येते की आपल्या देशातून फार पूर्वीपासून चांगले कापड बाहेर निर्यात होत असे. जूना पत्रव्यवहार पाहिला तर लक्षात येते कि फार पूर्वीपासून आपल्या देशाला ‘सिंधू’, ‘हिंदू’, ‘इंडस्’, ‘शिन्सू’ असे संबोधले जात असे. काही आंतरराष्ट्रीय मतभेदही होते. पण ते मतभेद कधी दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याइतपत टोकाला गेले नव्हते. सहिष्णूता सहजच सर्वांच्या ठायी होती. कोठवर?  बौद्ध धर्माच्या उदयापर्यंतच! नंतर परिस्थिती टोकाला गेली. म्हणूनच हिंदूंच्या आंतरराष्ट्रीय जीवनाचा विचार करताना बौद्ध धर्माची या देशाच्या इतिहासातील भूमिका यावर विचार करणे आवश्यक ठरते. कित्येक इतिहासकारांनी यावर आपली मते मांडली आहेत. आपण येथे पाहू कि सावरकर या विषयावर आपल्याला काय सांगत आहेत.


बौद्धधर्माच्या उदयानंतर बौद्ध भिक्षूंच्या यात्रा सतत अन्य देशांमध्ये होत असत. त्यांची विद्वत्ता, वैराग्याचे विचार, अहिंसा व विश्वबंधुत्वसारख्या उदार मतांचे अवलंबन यामुळे हा धर्म सहजच जगाचे आकर्षणकेंद्र बनला. सहजच बौद्ध धर्मापाठोपाठ हिंदूराष्ट्रही सर्वांच्या कौतुकाचे केंद्र बनले. म्हणूनच असे म्हणता येते की बौद्ध धर्म कळत-नकळत आपल्या हिंदूराष्ट्राला जगात एक आकर्षणबिंदू बनवण्यास कारणीभूत ठरला. असो. पण बौद्ध धर्माच्या विश्वबंधुत्वाचा फायदा ज्ञानी, गरजू व विवेकी लोकांना होण्याऐवजी  अज्ञानी, आळशी व स्वार्थी लोकांनाच झाला; कारण त्याकाळी बौद्ध धर्माची दिक्षा घेऊन भिक्षू झाल्यास तशा लोकांना बौद्ध विहारांतून, मठांतून मोफत राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय करून दिली जात असे. साहजिकच कर्माला अशाने गौणत्व येऊन अनाचार, कर्मशून्यतेची वृत्ती सर्व बौद्ध भिक्षूंमध्ये पसरली. याशिवाय अशी मोफत खाण्या-पिण्याची व राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अर्थातच बौद्धभिक्षू राजाश्रय शोधत असत व जेथे राजा अशा अनाचाराला प्रोत्साहन व समर्थन देईल तेथे ते मठ-विहार बांधून राजावर सर्व भार टाकून देत असत. साहजिकच वैदिक संस्कारात वाढलेल्या बहुसंख्य राजांना हे कालांतराने अशक्य आणि अव्यवहारिक आहे याची जाणीव झाली व त्यांनी बौद्ध धर्माला दिलेला पाठिंबा काढून घेतला. हेच कारण झाले बौद्ध भिक्षूंच्या मनात हिंदू राजांविषयी अनास्था निर्माण होण्याचे.


गोष्ट एवढ्यावरच संपली असती व कर्मशून्य झालेल्या बौद्ध भिक्षूंनी आपल्यास अनुकूल प्रदेश शोधला असता तरी भागले असते; परंतु तसे झाले नाही. त्याउलट बौद्ध भिक्षूंनी पूढे झालेल्या परकिय आक्रमणांमध्ये हिंदू राष्ट्राशी दगा करून परकिय आक्रमकांना समर्थन दिले. कशासाठी? तर केवळ राजाश्रय मिळावा आणि असहकार करणाऱ्या हिंदू राष्ट्रांना अद्दल घडवावी म्हणून! पण परिणाम काय झाला? हिंदू राष्ट्रांवर २००० वर्षांपर्यंत भरून न निघणारे संकट ओढवले. एवढेच नाही तर परकिय राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणांमध्ये हिंदूस्थानी वैदिक समाजापेक्षाही बौद्ध भिक्षूंची निर्दयी कत्तल केली. जे हिंदू बौद्ध राष्ट्रे होती त्यांची काय दशा झाली? बौद्ध धर्मातील अहिंसा तत्त्वाचा नीट अर्थ न समजता विपरीत अर्थ लावल्याने ती राष्ट्रे युद्धाशिवायच परकिय राष्ट्रांच्या पाशवी आक्रमणांत नामशेष झाली. यामुळेच बौद्धांनी जाणलेले आणि आत्मसात केलेले अहिंसेचे तत्त्वज्ञान किती पोकळ आहे हे सगळ्यांना समजून चुकले. नरभक्षी वाघासमोर काय अहिंसा दाखवणार? माणसाने कमीत कमी दुसऱ्या माणसाशी तरी माणसाप्रमाणे वागावे ही साधी समज ज्यांच्या वंशात कोणालाच नव्हती, त्यांना कोणत्या अहिंसेने खूष ठेवता येईल? हे न समजून घेता सत्ता कोणाचीही असो पण आमच्याच धर्माला राजाश्रय मिळायला हवा, असा निराधार आणि अव्यवहारिक हट्ट या बौद्ध भिक्षूंनी धरला, त्यामुळे बौद्ध धर्माची विश्वव्यापक उदार तत्त्वे बाजूलाच राहून या धर्माचे अनुयायी हिंदूमत्सरी, हिंदूराष्ट्रद्रोही, आततायी, सुखलोलुप, ज्ञानविहिन बनते झाले.


वर सांगितलेल्या व याहूनही अन्य बहुत कारणामुळे बौद्ध धर्माचे मूळ शांतीचे तत्त्व बाजूला राहून हा धर्म हिंदूस्थानातील जनमानसातून लोप पावू लागला. खरे तर आजही बौद्धांना हिंदू राष्ट्रांत भय मानण्याचे व परकियांना आमंत्रित करण्याचे आत्महननी कार्य न करता हिंदूंच्या सहिष्णूतेच्या वृक्षातळी निवांत आपला निर्वाणाचा अभ्यास करायला हरकत नाही. पण आसक्ती जशी कालांतराने वृत्ती बनते , तशी हिंदूराष्ट्रातील लोक असहिष्णू आहेत अशी ओरड करण्याची या लोकांची वृत्तीच बनली आहे. द्रोह स्वकियांनी केला तर तो स्वकिय आपण परकियच समजतो. भिन्न भिन्न राष्ट्रे शेजारी शेजारी गुण्या-गोविंदाने नांदू शकतात हे आशिया खंडातील अतिप्राचीन संस्कृतींनी दाखवून दिले आहे. शिवाय राजाश्रयाचा हव्यास न धरताही विभिन्न संस्कृती एकाच राष्ट्रात नांदू शकतात, हे हिंदूस्थानातच घडले आहे. पण मूळातच संबंध ईर्षा, स्वार्थ, मत्सराने लिप्त असेल तर द्रोह ही सहज प्रवृत्ती होते, हे इतिहासावरून ध्यानात येते.


आंतरराष्ट्रीय व्यवहारात नेहमी अग्रेसर असणारा हिंदू उत्तरेला अटक आणि दक्षिणेला समुद्र यांच्या मर्यादेत कसा सापडला? त्याला जबाबदार ठरली मुस्लिम व इंग्रज, तुर्की, पोर्तुगीजांची धर्माक्रमणे! ग्रीक, हूण, शक-कुशाण यांची आक्रमणे आणि तदनंतर झालेली म्लेंछ मुसलमान व पाश्चात्यांची आक्रमणे यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे मुसलमान आणि इंग्रजादि पाश्चात्यांनी हिंदुस्थानातील प्रजेचे बलात्काराने धर्मपरिवर्तन केले. धर्मपरिवर्तन हे असे अस्त्र मुसलमान आणि इंग्रजांनी वापरले कि ज्यामुळे त्यांचा सामना करणे दुष्कर होऊन बसले व वाळवी लागलेल्या लाकडाप्रमाणे भरतभूमी आतून पोखरून निघू लागली. धर्मपरिवर्तन हे श्रद्धापरिवर्तन, आस्थापरिवर्तन आणि मातृभूमीपरिवर्तन ठरते, म्हणूनच ते आधिक घातकी ठरते. हिंदूंचे होणारे सततचे बलात्कारित धर्मपरिवर्तन थांबवण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी धर्मदंडाचा वापर केला, कारण अटकेपलीकडचा प्रदेश हा मुसलमानव्याप्त झाला होता आणि भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश इंग्रजादि पाश्चात्यांनी व्यापलेला होता. याची जाणीव न ठेवता तथाकथित सुशिक्षितांनी तत्कालीन धर्मरक्षकांवर धर्मांधतेचा आरोप लावून मनुस्मृती सारखा पवित्र ग्रंथ जाळण्याचे लाजिरवाणे कृत्य केले. असो! कर्मगती त्यांना योग्य ते उत्तर देईलच. बौद्ध कालापासून सुरू झालेल्या आक्रमणांचा व त्याविरुद्ध दिलेल्या झुंजीचा हा हिंदुत्वाच्या विजयाने झगमगणारा सोनेरी इतिहास वारंवार लिहावाव वारंवार गावा असाच आहे. असा आपला तेजस्वी इतिहास आपण पुढिल लेखात पाहू. तोवर जय श्रीराम |

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

No comments:

Post a Comment