स्वधर्म-स्वराज्य


धर्म व्यापक आहे. स्थल-काल-परिस्थितीनुसार बदलणारा आहे. पण तरी तो न्याय्य आहे आणि म्हणूनच तो सज्जनांस सुखाचे एकमेव कारण व स्थान आहे. आपल्या सभोवतालची परिस्थिती, काळ व आपली भूमिका लक्षात घेऊन सर्वांस कल्याणकारक त्या आपल्या धर्माचे पालन करणे हा प्रत्येकाचा स्वधर्म ठरतो. उदा. राजाने न्यायाने राज्य चालवावे हा राजाचा स्वधर्म ठरतो, तर प्रजेनेही राजाला आवश्यक ते सहकार्य देऊन राजनियमांचे पालन करणे हा प्रजेचा धर्म ठरतो. राजा धूर्त, कपटी, अधर्मी व अन्यायी असल्यास त्याला निलंबीत करून दुस-या योग्य राजाची नियुक्ती करणे हा प्रजेचा धर्म आहे. याच प्रकारे अगदी घराघरात, पावलोपावली आपली कोणती श्रेयस भूमिका आहे ते जाणून सर्वांनी त्याचे पालन करावे हा स्वधर्म ठरतो.
आपल्या घर-परीवारासंबधाने आपला काही विशिष्ठ धर्म असतो, आपल्या राज्यासंबंधाने आपला काही धर्म असतो, या सबंध विश्वासंबंधातही आपला काही धर्म आहे; एवढेच नाही तर हे विश्व ज्याच्यापासून प्रसवले आहे त्या ईश्वरासंबंधानेही आपला विशिष्ठ धर्म आहेच! ‘बहुस्याम् ।’, हा त्या परमतत्त्वाचा संकल्प पूर्णत्वाला नेणे हाच तो ईश्वरासंबंधीचा परम धर्म आहे. म्हणजे आपण ईश्वराची पूजा करता करता ईश्वरासम होऊन जावं. लक्षात घ्या, हा परम धर्म आपला परम अर्थ म्हणजे स्वार्थ व्हावयास हवा. मग या परमार्थाच्या प्राप्तीसाठी दृश्यानुषंगाने जे जे आपले धर्म ठरतात ते आपण पार पाडावयासच हवे. त्याशिवाय परमार्थाची प्राप्ती नाही.
कुटुंबातील प्रत्येकाला स्वधर्मपालन करता यावे म्हणून कुटुंबव्यवस्था आहे. समाजव्यवस्थाही समाजाच्या उद्धारासाठी आहे. त्याप्रमाणेच राज्यव्यवस्थासुद्धा ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या साक्षात्कारासाठी आहे, निव्वळ घराणेशाही म्हणून एका घराण्यासाठी ती मूळीच नाही अथवा काही मंत्र्यांना आलिशान घरात राहता यावे व सर्व चांगली-वाईट सुखं उपभोगता यावी म्हणून तर मूळीच नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आपापल्या स्वधर्माचे निष्कंटकपणे पालन करता यावे यासाठी राज्यव्यवस्था आहे. तेच राज्य स्वराज्य म्हणून नागरिक अभिमानाने मिरवतात. अहो! आपल्याच राज्यात आपल्याच देव-देश-धर्माची मर्यादा राखली जात नाही, ते काय आपले राज्य! आपल्याच राज्यात राज्यातील बहुसंख्य लोकांना उच्च शिक्षण घेता येऊ नये ते काय आपले राज्य! आपल्याच राज्यात प्रजेला सकस आहार मिळू नये आणि येथील शेतक-याला आत्महत्या करण्याची वेळ यावी ते काय आपले राज्य! एकवेळ राज्य आपले असेल पण तरी स्वराज्य नसेल! करा, तूम्हीच विचार करा!
स्वधर्माचे पालन जेथे करता येते तेच स्वराज्य व स्वधर्मपालन करणा-या शासकाचे जे राज्य तेच स्वराज्य! होय, स्वधर्म जाणून त्याला वाहून घेतलेल्या महानुभवांकडूनच स्वराज्याची स्थापना होते, यास इतिहास साक्षी आहे. असे असता स्वराज्यप्राप्तीनंतरही स्वधर्माची कास सुटता कामा नये! नाहीतर काय उपयोग त्या स्वराज्याचा? त्या राज्याची लवकरच राख होऊ शकते, म्हणून स्वधर्म व स्वराज्य एकमेकांस आधारस्तंभ आहेत. प्रत्येक धार्मिक समारंभानंतर गायली जाणारी सामुहिक प्रार्थना ‘मंत्रपुष्पांजली’ हाच भाव प्रकट करते. जेव्हा जेव्हा स्वधर्म चुकतो, तेव्हा तेव्हा स्वराज्यालाही अवकळा येते व जेव्हा जेव्हा स्वराज्याला हानी पोचते, तेव्हा तेव्हा स्वधर्मानेच त्याचे रक्षण करता येते.

No comments:

Post a Comment