ग्रंथ-परंपरा


ग्रंथ हे आयुष्यरूपी मार्गावरील मार्गदर्शक दिपस्तंभ आहेत. देवाचे स्वरूप कवेत घेऊ पहाणारे शब्द आणि या शब्दांना झेलून सांभाळून ठेवणारी कुपी म्हणजे ग्रंथ ! जो ही कुपी सांभाळतो व त्यातील अवीट शब्दब्रह्मरूपी अमृत आयुष्यभर चाखतो, तोच अमर होतो. संतांनी हे ग्रंथ आत्मसात केले व अधिकाधिक ग्रंथरचना करून ज्ञान जतन करण्याची सोयही करून ठेवली आहे. आपण ही ज्ञानपरंपरा जतन करण्यात आपले योगदान देऊया.
मी अध्यात्म मार्गात लागल्यावर भगवद् गीतेपासून सुरूवात करून नाना ग्रंथ अभ्यासले, पण लहान तान्हुल्याला कसे आईचे स्तन्यच अधिक उपयुक्त असते, तद्वत मला सर्व ग्रंथांहून माझ्या सद्गुरूंच्याच ग्रंथांचे अधिक कौतुक वाटते. सद्गुरू जवळ नसताना या ग्रंथांनीच आम्हाला परब्रह्माच्या जाणीवेत रहावयास मदत केली. याच ग्रंथांच्या वाचन-श्रवण-मनन-चिंतन-कीर्तनाची पुनः पुनः आवर्तने करून त्या ग्रंथांतील मौलिक ज्ञानच आमचा स्वभाव झाला. तेच ज्ञान लोकांपर्यंत पोहचावे याच अंतःकरणाच्या तळमळीने आणि त्या ईश्वराच्याच प्रेरणेने माझ्या सद्गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथांची संक्षिप्त माहिती येथे देत आहे.



मंत्रपुष्पांजली

श्री. प्रमोदजी जोशी यांच्या सत्संगातून श्रीमद् भगवतगीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीदासबोध, श्रीमद् एकनाथी भागवत इ. अनेक ब्रह्मरसाने ओतप्रोत भरलेल्या ग्रंथांचे निरूपण ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मुनी वशिष्ठ, वाल्मिकी, व्यासांपासून उगम पावलेल्या गुरूशिष्य परंपरेने निरंतर प्रवाहित असलेल्या या ज्ञानगंगेत आम्हालाही नित्य स्नान घडत आहे, हे श्री. प्रमोदजी जोशींचे आमच्यावर थोर उपकारच आहेत. श्री. प्रमोदजी जोशी हे निरूपण करताना श्रोत्यांशी आत्यंतिक जिव्हाळा ठेवून तत्त्वाशी जवळीक साधतात. म्हणूनच कोणताही सायास न करता देवघरातील देव आमच्या हृदयातच राहू लागला. देव-देश-धर्माचा अभिमान हेच आमचे सहज स्फुरण झाले. त्यांच्या मुखातून श्रीज्ञानेश्वरी श्रवण केली तेव्हा ग्रंथ-निरूपण पूर्ण होईपर्यंत तब्बल चार वर्षे श्रीमाऊलींच्याच सहवासात आम्ही जगलो असा अनुभव आला. संत तुकारामांची गाथा, संत समर्थ रामदास स्वामींचा दासबोध श्रवण करताना तर जणू आम्ही महंतच आहोत असे वाटले आणि देव-देश-धर्मासाठीच आमचे प्राण प्रत्यक्ष श्रीसमर्थ रामदासांनाच समर्पित झाले. आमचे आम्ही उरलोच नाही तर स्वराज्य आणि स्वधर्माचेच दास झालो. आज श्री. प्रमोदजी जोशींच्याच प्रेरणेने त्यांच्याच प्रवचनातील काही सुविचार मी मंत्रपुष्पांजलीच्या अर्थरूपात येथे मांडत आहे.
आपल्या वैदिक संस्कृतीनुसार प्रत्येक धार्मिक विधीनंतर ‘मंत्रपुष्पांजली’चे प्रार्थनामंत्र गायले जातात. हाताच्या ओंजळीत फुले घेऊन ही मंत्रपुष्पांजली उच्चारवाने सामुहिकरित्या गायली जाते. या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ पाहता वैदिक परंपरेने चालत आलेल्या देव-देवतांच्या पूजेमागील किंवा त्यांच्या प्रार्थनेमागील उद्देश स्पष्ट होतो. तो उद्देश हाच की प्रत्येक कार्य मग ते धार्मिक असो वा अन्य कोणतेही असो, ते केवळ सांसारिक सुखलोलुपतेचा भाव ठेऊन न करता व्यापक राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय हिताचा भाव ठेऊनच घडले पाहिजे. ‘इदं न मम । राष्ट्राय स्वाहा ।।’, हाच तो भाव आहे. आज नेमका हाच भाव सुखासीन समाजमनातून लुप्त झाला आहे. प्रत्येक उपस्थित कर्मामागील ईश्वराचा संकल्प बाजूस सारून स्वतःचेच संकुचित संकल्प बाळगले जातात, म्हणूनच कोणताही पूजाविधी, कर्मकांड कोणालाच फळत नाही.

अहो, प्रत्येक धार्मिक कार्यात जे देवी-देवता पूजले जातात, ते सर्व शस्त्रधारी आहेत, ज्ञानी आहेत, धर्मधुरंधर आहेत, तेजस्वी आहेत व राष्ट्रीय संपन्नतेचे प्रतीक म्हणून नानाविध वस्त्रालंकार परिधान करणारे आहेत आणि हे सारे वैभव त्यांनी दैत्यांचा विनाश व सज्जनांच्या उद्धार करण्यासाठीच वापरले आहेत. म्हणूनच ते आपणांस पूज्य आहेत. या मंत्रांचे उच्चारण करणा-यांमध्ये उतरणारा पूज्य देवतेचा हाच व्यापक, राष्ट्रीय, वैश्विक संस्कार ही या मंत्रांची फलश्रुती आहे. याच वैश्विक संस्कारामुळे केवळ एका जीवालाच नव्हे तर सबंध समाजाला एकमताने, परस्पर सहकार्याने ईश्वराप्रत पोचता येते. स्वधर्माची कास धरून राष्ट्रोन्नती साधण्याचा मंत्र येथे सांगितला आहे, म्हणूनच ही आपली राष्ट्रीय प्रार्थना आहे.

श्री प्रमोदजी जोशीं या पवित्र मंत्रपुष्पांजलीचा अर्थ समाजात सर्वदूर पसरविण्याचे कार्य हाती घेतले आहे. सद्गुरूंच्या कार्यात सहभाग म्हणून त्यात हा खारीचा वाटा आहे.




मंत्रपुष्पांजलीची फलश्रुती ही एकट्या-दुकट्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती एकाच राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेल्या समुदायाला मिळते. उदा. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी शिवाजी राजांना हाताशी घेऊन आपल्या शिष्य-महंत व मावळ्यांसमवेत प्रार्थिलेली व आचरलेली मंत्रपुष्पांजली सर्व सज्जनांच्या समुहाला फळली. याचा प्रत्यय आजही घेता येतो.


चिंतन

बोधाचा प्रकाश चिंतनाच्याच गाभाऱ्यात पसरतो. कोणतेही ज्ञान केवळ कानावर पडून भागत नाही, तर शुद्ध, मत्सरविहिन मनात त्यावर चिंतन होऊन उत्पन्न झालेले बोधरूपी सार जेव्हा हृदयात मुरते तेव्हाच सत्-शिष्याची क्रिया पालटून आत्माराम प्रकाशित होतो.
चिंतन देखील योग्य दिशेने झाले तरच उपयोगी पडते. अन्यथा साधक शब्दजंजाळात सापडतो. सुदैवाने सद्गुरू श्री. प्रमोदजी जोशी यांच्या प्रवचनातील मौलिक ज्ञान जेव्हा चिंतन या ग्रंथाच्या रूपात प्रथमतः वाचले, तेव्हाच माझ्या चिंतनाला खऱ्या अर्थाने चालना व योग्य दिशाही मिळाली. सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात सांगितलेली आहेत. म्हणून आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची तात्विकता समजून आली. सृष्टिची उत्त्पत्ती कशी झाली? का झाली? येथून सुरूवात होऊन भजन कसे करावे? पाप ते कोणते? पुण्य ते कोणते? नैष्कर्मयोग तो कसा? कर्माचे धारणेनुसार प्रकार कोणते? आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म कोणता? भगवंतांचा ऐश्वर्ययोग तो कोणता? सगुण ब्रह्म म्हणजेच सद्गुरूंची महती गाऊन शेवटी परमात्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांशी प्रत्यक्ष भेट घालून दिली आहे. आपणही जरूर या पुस्तकाच्या सहाय्याने ब्रह्मविचारापर्यंत झेप घ्यावी ही सदिच्छा! जय श्रीराम |



यथार्थ जीवनयोग


भगवद् गीता - हिंदूंच्या आध्यात्मिक इतिहासातील अमृत ! मुद्दाम इतिहासातील म्हटले, कारण हा निव्वळ ग्रंथ नसून एका घटनेप्रमाणे सर्व हिंदूंच्या स्मृतीत आहे. केवळ स्मृतीत नाही, तर अभ्यासात आहे. स्वधर्म व स्वराज्यक्रांतीकारकांना झालेल्या याच ग्रंथाच्या प्रेरणेने आमचा सुवर्ण इतिहास घडला आहे. म्हणून आपल्या आधुनिक इतिहासालाही जणू भगवत्स्पर्श घडला आहे. वर्षानुवर्षे प्रेरणा देत असलेला हा ग्रंथ हिंदूस्थानचा धर्मग्रंथ आहे.
मी देखील सुरुवातीला जिज्ञासा म्हणून हा ग्रंथ वाचायला घेतला. खूप खूप आवडला म्हणून जरी समजला नसला तरी पुन्हा पुन्हा वाचला. पण सद्गुरू श्री प्रमोदजी जोशी काकांचा 'यथार्थ जीवनयोग' हा भगवद् गीतेवरील निरूपण ग्रंथ वाचनात आला, तेव्हा भगवद् गीता वाचनाचा नियम सुटला आणि मग हा जीवनयोगच साधण्याच्या दिशेने पावले पडू लागली. ज्ञान आणि विज्ञानाची परस्परांना जोड असल्याशिवाय आपला यथार्थ विकास होऊ शकणार नाही , या तत्त्वासोबत पुस्तकाची सुरूवात होऊन ज्ञान-विज्ञानमय कर्माचरण कसे असावे? ज्ञान आणि विज्ञान भक्तिच्या पार्श्वभूमीवरच शोभून दिसतात म्हणून पुढे भक्तिचे निरूपण केले असून शेवटी ज्ञान - विज्ञान, कर्म-भक्ती ज्या आत्मतत्त्वाला जागृत करून त्यातच विलीन होतात, असे ते आत्मतत्त्व व त्यापासून दृश्याची होणारी उत्पत्ती या विषयावर निरूपण केले आहे. एवढ्या मोजक्या पण सहज शब्दांत तत्त्वज्ञान खरंच संतांशिवाय कोणाला सांगता येत नाही. सद्गुरूंचा अनुभव शब्दात उतरून आमच्या हृदयात मुरत आहे, किती हे आमचे भाग्य!


व्रतस्थ


जीवनात निर्बंधांपासून वाचायचे असेल तर सूज्ञ मनुष्याने आधीच स्वतःला नियम घालून घ्यावेत. जगात बद्ध मनुष्य कित्येक वेगवेगळ्या नियमांमध्ये गुरफटलेला असतो- काही स्वतःचे नियम, कुटुंबाचे नियम, समाजाचे नियम! काही नैतिक तर काही उगाच लावून घेतलेले! अशा नियमांनी देवाची प्राप्ती तर होतच नाही पण लौकिक बंधने अधिकाधिक घट्ट होत जातात.
सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी आपल्यासारख्या अभ्यासू लोकांना देवाची प्राप्ती करून देणारे नियम म्हणजेच शुद्ध सात्विक जीवन-व्रताचे नियम 'व्रतस्थ' या पुस्तकात संकलित केले आहेत. सर्व ग्रंथ वेदांपासूनच उत्पन्न झाली आहेत. कोणी नवीन ज्ञान शोधून काढू शकत नाही. तेच सर्व ग्रंथांतील पवित्र सार या ग्रंथात सांगितले आहेत. मनाच्या श्लोकांप्रमाणेच रोज आवर्तने करण्यासारखे हे पुस्तक आहे. साधकांनी हे पुस्तक जरूर जवळ बाळगावे व अंतापर्यंत व्रतस्थ राहावे. जय श्रीराम |


प्रभाते मनी



समर्थ श्रीरामदास स्वामी यांनी देशभर अध्यात्मयात्रा करून कित्येक शिष्यांना ज्ञानदान करून समर्थ महंत बनवले. सर्व प्रकारच्या आध्यात्मिक अवस्थेतील आपल्या शिष्यांना शाश्वत तत्त्वाचा बोध करून देण्यासाठी त्यांनी स्वतः विपुल ग्रंथरचना केली. त्यातील मनाचे श्लोक ही एक विलक्षण रचना आहे. कारण अत्यंत बलाढ्य, हट्टी अशा या मनावर आधीच पुष्कळ अभंग रचना उपलब्ध आहे, पण पूर्ण पुस्तकभर केवळ मनाला उपदेश या एकमेव ग्रंथात केला आहे. सर्व वासना मनाच्या ठायी एकवटलेल्या असतात. मग मनात उत्पन्न होणाऱ्या मोहमयी विचार, कल्पनांद्वारे तीच वासना देहादेहात भिनते. पण याच मनाला चुचकारून , लाडी-गोडीने जर आपण सन्मार्गी लावले तर हेच मन देवाच्या भेटीसाठी हट्टास पेटते व अधिक वेगाने देवाची प्राप्ती करून देते.
सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी याच उद्देशाने मनाच्या श्लोकांचे सार्थ विवरण 'प्रभाते मनी' या पुस्तकात केले आहे. मनाच्या श्लोकांचा स्वामींचा भाव जशाच्या तसा मराठी भाषेत आणून सद्गुरूंनी आपल्यावर फार वात्सल्य लावले आहे. मोठ्या पण स्पष्ट आणि श्राव्य ध्वनीत मनाच्या श्लोकांची आवर्तने केल्यास व त्यांच्या अर्थावर शास्त्रोक्त मनन-चिंतन केल्यास निश्चितच जगाच्या संगतीत चंचल होणारे मन स्थिर होऊन शांती पावेल.



प्रवचनातून भक्तिझरा



साधकांना कर्माचे तत्त्व आणि ज्ञानाचे रहस्य समजून घेताना फार त्रास होतो. पण भक्ती मात्र नवख्यापासून श्री ज्ञानेश्वरांसारख्या योग्यांपर्यंत सर्वांना भावते. पण भक्तीचं स्वरूप जपमाळांपर्यंत, पूजा-अर्चा, उपास-तपासापर्यंत अथवा भजनी मंडळ-संप्रदायांपर्यंत मर्यादित नाही किंवा नवविधा भक्तींपैकी सोईस्कर वाटणाऱ्या कोणत्याही एक-दोन प्रकारांनी केली जाणारी नाही, तर सर्व प्रकारांनी होणे आवश्यक आहे. भक्तिच्या सर्व पायऱ्यांवर आरूढ होणे अपेक्षित आहे. अन्यथा ती भक्ती ठरतच नाही. आपणच विचार करा.
सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी नेमका हाच भाव आपल्या 'प्रवचनातून भक्तिझरा' यापुस्तकाच्या रूपात व्यक्त केला आहे. निर्गुण निराकार देवाने तेलासाठी दाणा निर्माण केला, वस्त्रासाठी कापूस निर्माण केला, पाण्यासाठी जलाशय, प्राण राखण्यासाठी वायू अशी कल्पनातीत, क्लीष्ट व्यवस्था करून ठेवली. केवळ आपल्यासाठी ! त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःची ओळख पटवून द्यावी व आपल्याला भक्तीमार्गाने आत्मोद्धार करता यावा, म्हणून तोच परमात्मा सगुण देह धारण करून अवतरित होतो. अशा सगुण ब्रह्ममूर्तींना नमन, वंदन, स्तवन, चरणसेवा, दास्यत्व, सख्यत्व आणि आत्मनिवेदन केल्याशिवाय भक्तीला सुरूवातही होत नाही तर त्यावर आरूढ होणे तर दूरच राहते. हाच या पवित्रतम ग्रंथाचा बोध मला झाला. नारदमुनी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, अर्जुन, उद्धव, गोपी आदि भक्तशिरोमणींनी आचरलेली भक्ति येथे सद्गुरूंनी आपल्याला शिकवली आहे. साधनमार्गात द्वितीय गुरूच असलेला हा भक्तिझरा ग्रंथ अभ्यासून आपणही अधिक उन्नत व्हावे ही शुभ कामना !


आत्माराम

कर्म, भक्ती आणि ज्ञान या तीन उपायांच्या सहाय्याने सुरू असलेला साधकांचा आध्यात्मिक प्रवास शेवटी स्वरूपप्राप्तीच्या ध्येयापर्यंतच येऊन पोचतो. स्वस्वरूपाची ओळख म्हणजे आत्मारामाशी एकरूप होऊन जाण्यातच मानवदेहाची सांगता होते. मग परमेश्वर होऊन परमेश्वरी संकल्प पूर्ण करणे हेच प्रयोजन उरते.
'आत्माराम' ग्रंथ पारंपारिक आध्यात्मिक ग्रंथांप्रमाणे गुरू-शिष्य संवादाच्या रूपात असून प्रथम अध्यायात एकाच आत्मतत्त्वाच्या निर्गुण व सगुण रूपांना वंदन करून समर्थ शिष्याला त्याला लागलेल्या झोपेची जाणीव करून देतात. हो, झोपेत कसे कळणार आपण झोपले आहोत ते? कोणी तरी हलवून जागं करायला हवंच की! पुढे आपण जगत असलेल्या आयुष्याची निरर्थकता पटलेल्या शिष्याची सद्गुरू परीक्षा घेतात. जसं झोपेतून उठलेला माणूस आळसावून पुन्हा थोडा वेळ झोपू पहातो, तसंच आपण संसारचक्रात गुरफटल्याची जाणीव होऊनही कित्येक जण पुनः 'ये रे माझ्या मागल्या' म्हणत ज्ञानमार्गाकडे पाठ फिरवतात. समर्थांचा शिष्य मात्र परिक्षेत खरा उतरतो. परत निघालेल्या सद्गुरूंचे पाय धरून त्यांना अंतःकरणाच्या तळमळीने थोडा अधिक वेळ थांबण्यासाठी विनवतो. शिष्याचा समर्पणभाव व तळमळ पाहून सद्गुरू पुढे त्याला मायेचे मिथ्यत्व व परमतत्त्वाचे नित्त्यत्व पुढील दोन अध्यायातून समजावून सांगतात. सद्गुरू प्रत्येक भेटीत शिष्यावर मोक्षाची उधळण करतात, पण शिष्य जगाच्या संगतीत जाताच पुन्हा बद्धत्व अंगिकारतो. म्हणूनच सद्गुरूंकडून प्राप्त ज्ञान टिकवून ठेवावे लागते. त्यासाठी सद्गुरू शिष्याला सगुण उपासनेचा उपदेश करतात. अंततः स्वानुभव-निरुपण या अध्यायात स्वरुपारूढ शिष्य स्वतः स्वतःचा अनुभव कथन करतो.
आत्मारामाचे सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी केलेले निरुपण अद्वितीय आणि पारलौकिक आहे कारण सतत ईश्वराच्या जाणीवेत राहणाऱ्या भक्ताचे स्फुरणच ईश्वराचे असते. अधिक काय सांगावे, आपण हे वाचूनच पहा.


मुक्तिगाथा


भगवंत ज्या कारणासाठी या पृथ्वीवर अवतरीत होतात, ते कारण म्हणजे 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' त्यानिमित्ताने संगतीला येणाऱ्या सज्जनांना ज्ञानदान करून मोक्षाचा मार्ग मोकळा करून देऊन व पात्र शिष्यांना ज्ञानदानाची आज्ञा करून वैदिक परंपरेतील हे ज्ञान जतन करण्याची व्यवस्था करून ठेवतात. भगवंत अशा प्रकारे धर्माची विस्कटलेली घडी पुनः बसवतात. असे जे भगवंताचे कार्य तोच आपलाही धर्म आहे. म्हणूनच स्वधर्माच्या पालनाशिवाय व स्वराज्याच्या स्थापनेशिवाय आपली मुक्ति कधीच पूर्ण होऊ शकत नाही. थोड्या सोप्या शब्दांत सांगावयाचे झाले तर असे सांगता येईल कि स्वधर्माचे पालन करणाऱ्याच्या ठिकाणी स्वराज्यासाठीची तळमळ असते व स्वराज्याचे कार्य केल्याशिवाय स्वधर्माचे यथार्थ पालन होत नाही.
सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशींनी हाच विषय सांगण्यासाठी काही संत व काही स्वराज्यक्रांतीकारक यांच्या आयुष्यातील मार्मिक प्रसंग निवडून त्यांच्या जीवनचरित्राची 'मुक्तिगाथा' गायली आहे. आज कितीतरी स्वतःला सद्गुरू म्हणवून घेणारे लोक आहेत ज्यांनी आपले आपले संप्रदाय काढले आहेत. पण तुम्हीच विचार करा, चार तास एकत्र जमून केवळ माळा ओढत बसणं वा अभंगगान करणं, पण नंतर मात्र यथेच्छ खाण्यापिण्याचे वा नृत्यगायनाचे कार्यक्रम पाहत बसणं, पंचतारांकित उपभोग घेणे, हे कोणते स्वधर्माचे पालन झाले. ऐन युद्धाची वेळ आली की असे भंपक संप्रदायिक दार लावून घरात लपून राहतात. आपण सर्वांनी ती परधर्माची वाट धरू नये म्हणूनच स्पष्ट सत्य सांगणाऱ्या या पुस्तकाची रचना सद्गुरूंनी केली आहे. हेच काय ते वेदांचे सार आहे. कित्येक साधकांना तर हे ही सांगता येत नाही की मुक्ति कशासाठी प्राप्त करावी? असो. आत्माराम वाचून जर मुक्तिगाथा वाचली नाही तर आत्मारामाची प्राप्ती कदापि होणे शक्य नाही. 
जय श्रीराम | 
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय |


आतां विश्वात्मके देवे

श्रीज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानयज्ञ पूर्ण केला. यज्ञदेवता प्रसन्न झाल्यावर यज्ञदेवतेसमोर प्रसाद मागावयाचा असतो, असा प्रघात आहे. श्रीज्ञानेश्वरदेखील परमात्मस्वरूप श्रीगुरू निवृत्तीनाथांना कृपाप्रसाद मागतात. हा कृपाप्रसाद 'पसायदान' म्हणून आपण ओळखतो.
काळासमवेत आज ज्ञानेश्वर महाराज व सद्गुरू निवृत्तीनाथही येथे नाहीत. पण अज्ञानी जन मात्र आहेतच. त्यांचीच दया येऊन सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी तेच पसायदान पुन्हा व्यापक अर्थाने त्यांच्या सद्गुरूंना मागितले. मग सद्गुरूंनीही अत्यंत कृपाळू होऊन जो कृपाप्रसाद दिला, तोच या 'आतां विश्वात्मके देवे' या पुस्तकरूपाने प्रकट झाला आहे. एका पसायदानावर संपूर्ण पुस्तक लिहिलेले असून पुस्तक वाचताना श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासाची जाणीव होते. सर्व संत हे परब्रह्मस्वरूप असतात, म्हणूनच माऊलींच्या साऱ्या खूणा आपल्याला सद्गुरूंच्या ठिकाणी पहावयास मिळतात. याच खूणा अंगिकारून आपणही त्या परमपदावर आरूढ होऊयात. 
 जय श्रीराम ।


हृदयस्थ

देवावर प्रिती करता यावी यासाठी देवाच्या स्वरूपाला यथार्थ जाणणे आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय केलेली भक्ति आंधळी असते व प्रेम प्रेम नसून मोह असतो. हेच पिंड-ब्रह्मांडाचे ज्ञान सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांच्या ‘हृदयस्थ’ या पुस्तकात मांडले आहे.
‘हृदयस्थ’ हे कठोपनिषदावरील निरूपण आहे. पित्याच्या आज्ञेचे पालन करून नचिकेत यमसदनी जातो व यमधर्माला जे श्रेष्ठ प्रश्न विचारतो त्यांचा अभ्यास येथे केलेला आहे. आत्मा कोण? तो या देहात कोठे स्थित असतो? बंध काय, मोक्ष काय? आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याचा उपाय कोणता? अशा आध्यात्मिक प्रश्नांवरील चर्चा येथे मांडली आहे. यथार्थ जीवनयोग या पुस्तकाप्रमाणे येथेही अत्यंत मोजक्या पण सोप्या शब्दात ज्ञान हा विषय मांडलेला आहे.


गुरूपाठ

आईप्रमाणे आपले बोट पकडून आपल्याला मोक्षपथावर चालवितो तो सद्गुरू ! 
कधी प्रेमाने समजाऊन तर कधी कान पिळून मार्ग चूकलेल्यांना सत्पथावर आणतो तो सद्गरू !
 धर्म हाच स्वभाव व अधर्माची चीड ज्याला असते तो सद्गुरू ! 
जगाचे चटके अनुभवलेल्यांसाठी विसाव्याचे ठिकाण म्हणजे सद्गरू ! 
ज्ञानी लोकांचे ध्येय व पूजकांची पूज्य देवता म्हणजे सद्गुरू ! 
विवेकाचे माहेरघर जो गणेश त्याच्या खूणा म्हणजे सद्गरू ! 
जाणीवेची पारलौकिकता व वात्सल्याची यथार्थता म्हणजे सद्गुरू ! 
स्वधर्माचा पाया आणि स्वराज्याची इमारत सांभाळतो तो सद्गुरू !
अशा या सद्गुरूंची भक्ति कशी करावी बरं? कोणत्या उपायाने सद्गुरूंचा जो हेतू म्हणजे आपले कल्याण साधावयाचे? सबंध आयुष्य जगाच्या सहवासात जगलो, आता देवाच्या सहवासात कसे राहायचे? सद्गुरूंना काय द्यायचे, त्यांच्याकडून काय घ्यायचे? इत्यादी सर्व शिष्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी सार्थ ‘गुरूपाठ’ या आपल्या रचनेत दिले आहे. हरिपाठाप्रमाणेच रचना असलेला हा अभंगग्रंथ अत्यंत मार्मिक आहे. अभंगरचना आजच्या मराठी भाषेत असल्यामुळे अत्यंत सुबोध आहे. आपणही हा ग्रंथ कंठस्थ करून याचा लाभ घ्यावा हा विनंतीवजा आग्रह आहे. जय श्रीराम !


हिंदू धर्मसंस्कृती

प्रत्येक सजीव-निर्जीवाचा धर्म हा त्याच्या जन्माच्या आधीपासूनच निश्चित झालेला असतो. परब्रह्माप्रमाणेच हा धर्मही सनातन आहे. तो धर्म म्हणजे ईश्वरप्राप्ती ! ईश्वरप्राप्तीसाठी अनुकूल आणि या आदर्श जीवनप्रणालीच्या जोपासनेसाठी आवश्यक सर्व गोष्टी धर्म या संज्ञेत समाविष्ट होतात.
हे आदर्श जीवन जगण्याचे शास्त्र, की ज्याच्या आचरणाने एक मनुष्यच नाही तर अवघा समाज हातात हात घालून परमात्मतत्त्वाची, अमृतत्वाची वाट धरतो, ते सिंधू नदीच्या खोऱ्यात दिर्घ तपश्चर्येने, दिर्घ सदाचरणाने ऋषी-मुनींनी जाणले व अंतःप्रेरणेने रूढ केले. तेच शास्त्र आज हिंदू धर्म म्हणून प्रचलित आहे. तो एका समाजापुरता मर्यादित नसून सबंध मानवजातीसाठी आहे.
धर्माला जेव्हा अवकळा येते तेव्हा देवच धावून येतो व आपली व्यवस्था पुन्हा नीट लावून जातो. या गीतावचनानुसार सद्गुरु श्री प्रमोदजी जोशी यांनी ही सामान्य लोकांच्या विस्मृतीत गेलेली वेदोक्त तत्त्वे 'हिंदू धर्मसंस्कृती-एक समृद्ध जीवनपद्धती' या ग्रंथाच्या निमित्ताने सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी सद्गुरुंचा हा ज्ञानरूपी प्रसाद ग्रहण करावा ही सदिच्छा ! राजहंसालाही जोवर ठाऊक नसते की आपण राजहंस आहोत तोवर तो स्वतःला कुरूप समजून शोकच करत असतो, त्याप्रमाणे हिंदूंचे झाले आहे. आपला वारसा, वैभव हाताशी असून अज्ञानापोटी भयग्रस्त जीवन जगत आहे. आपणा सर्वांना आवाहन आहे की ही मरगळ झिगारून जोरात म्हणा, ‘आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय । जय माँ भारती ।‘


संस्कार, वाचा आणि सांगा गोष्टी भाग १,२,३,४






मातीच्या ओल्या गोळ्यावर सहजच योग्य ते आकार देता येतात, पण त्याच भाजलेल्या मातीच्या वस्तूला कोणताच आकार देता येत नाही. लहान मूलेदेखील या मातीच्या गोळ्याप्रमाणेच असतात, त्यांना आई-वडीलांनी, समाजाने घडवायचे असते. आजच्या या सर्व संस्कृतींची सरमिसळ झालेल्या या समाजात सर्व संस्कृती आपल्या बऱ्या वाईट संस्कारांचा आपल्या आचरणाद्वारे कळत-नकळत प्रचार करत असतात. अशामध्ये आपल्या चिमुकल्यांवरआपल्या सर्वश्रेष्ठ हिंदू संस्कृतीचे संस्कार कसे घडवणार याविषयी दक्ष असावयास हवे.
या चिमुकल्यांसाठी म्हणून सद्गुरू श्रीप्रमोदजी जोशी यांनी संस्कार, वाचा आणि सांगा गोष्टी भाग १,२,३,४ ही पुस्तके लिहिली आहेत. संस्कार मध्ये सूर्यनमस्कार, प्रार्थना, मंत्र, सणांची माहिती, देशभक्तिपर गीते इ. मूलभूत गोष्टींचा समावेश केलेला आहे. वाचा आणि सांगा गोष्टी भाग १,२ यामध्ये लहानग्यांसाठी पंचतंत्र,इसापनितीमधील बोधपर गोष्टी संकलित केल्या आहेत. आपल्या दैदिप्यमान संस्कृतीची महती ज्यांच्या जीवनचरित्रामुळे आपल्याला समजते, त्या अनेक विभूतींपैकी प्रभू श्रीराम आणि स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यांवर पुढिल दोन भाग लिहिले आहेत. देव-देश-धर्म याचे बाळकडू मूलांना पाजल्याशिवाय ते नरोत्तम होऊ शकणार नाही, सद्यपरिस्थिती पाहून हे सहज समजते. आपणही आपल्या मूलांवर हिंदुत्वाचे संस्कार घडवून या देशाच्या सर्वांगीण प्रगतीत आपली भूमिका वठवा, ही विनंती ! जय माँ भारती |।‘



No comments:

Post a Comment