Saturday, 7 December 2013

एकच ध्येय, एकच राष्ट्र आणि एकच नियम


मागील लेखात आपण हिंदुत्व आणि हिंदू धर्म या संकल्पनांमधील अंतर पाहिले. आज आपण आर्यांची हिंदुत्वाची संकल्पना विस्ताराने पाहू. हिंदुत्वाचे वैशिष्ट्य तिच्या उदयाच्या पवित्र प्रयोजनातच दडलेले आहे आणि ते पवित्र प्रयोजन म्हणजे 'एकच राष्ट्र, एकच ध्येय, एकच नियम!


कोणतीही संस्कृती उदयास येण्यापूर्वीच हे आर्य सिंधू नदिच्या खोऱ्यात वसाहत करून रहात होते. ते कोठून आले, केव्हा आले या प्रश्नांपेक्षाही या सत्याला महत्त्व आहे की त्यांनी सबंध जगापासून दूर असलेल्या या भूखंडालाच आपलेसे मानले व येथेच त्यांनी आपला यज्ञाग्नी प्रज्वलित करून येथील शांत वातावरणात आत्मोद्धाराचा अभ्यास सुरू केला. अतुल्य सामर्थ्य, अपरिमित बुद्धिमत्ता व अचाट आत्मशक्तीच्या बळावर आर्यांनी परब्रह्माला आपलेसे केले. या संपूर्ण वैभलाचा उपयोग त्यांनी एक अशी संस्कृती उभारण्यास केला की ज्या संस्कृतीसाठी लौकिक व पारलौकिक उद्धाराशिवाय जगण्याचा दुसरा हेतूच नाही. आर्यांची हा निर्णय कोणी एकट्याने केलेला नव्हता तर ते मूळातच एकाच ध्येयाने, एकाच आत्मप्रेरणेने प्रेरित झालेले असल्याने सर्वांनी एकमताने एक राष्ट्र, एक व्यक्ती व एकच नियमाचे अनुशासन अवलंबिण्याचा निर्णय घेतला.


एकाच देहाच्या अवयवांमध्ये जे सहज प्रेम असते, कारण अवयव वेगवेगळे असलेतरी जीव एकच असतो. याच तत्त्वावर आधारित ही संस्कृती आहे. एक संयुक्त राष्ट्र, एक संयुक्त समाजपुरूष आणि एकच संयुक्त नियम हेच हिंदुस्थानीना वर्षानुवर्षे एका सूत्रात बांधून आहे. या एकाच ध्येयायाठी आपले पूर्वज जीवन जगले व याच ध्येयासाठी आपण जीवन जगणे श्रेयस आहे. का? तर हाच परमात्याचाच संकल्प आहे,'मी एक आहे, मी अनेक रूपांत प्रकट व्हावे'. पहा हा एकजीवत्वाचा व अनेक होऊन एकच कार्य उभारण्याचा संकल्प देवाचाच आहे. शिवाय इतिहास चाळला तर हेच समजते की याच मार्गाने प्रशस्त जीवन जगता येते आणि सर्वांना हितकर हाच एक मार्ग आहे. याच एका ध्येयामुळे विभिन्न संप्रदायही एकाच देेशात गुण्यागोविंदाने नांदू शकतात. पण ध्येयच जर एक नसेल तर संप्रदाय एक असूनही एकत्र राहता येत नाही याला इतिहास साक्षी आहे.


अखंड समाजाला एकजीवित्वाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी हिंदुत्वात मोडतात. पण हे एकजीवित्व काही बळाने साकारता येत नाही. काही संप्रदाय अन्य धर्मीयांच्या जीवावरच उठलेले आहेत. 'धर्म बदल नाही तर मरणाला सामोरं जा', असा पवित्रा घेऊन जगात अराजकता पसरवत आहेत. पण त्यांना हे ठाऊकच नाही कि दोन देहांत राहूनही एकजीव होता येतं की आणि दोन वेगवेगळ्या रूढी - परंपरांच्या पार्श्वभूमीवरदेखील एकजीवत्व टिकवता येते. गरज असते ती एका ध्येयाची. इतिहास साक्षी आहे की काळाच्या ओघात याच संस्कृतीनेे अत्यंत बिकट अवस्थेतही तग धरून राहण्याचे कौशल्य दाखवलेले आहे. त्याचे कारण या हिंदुत्वाच्या एकराष्ट्रियत्वाच्या, एकजीवित्वाच्या तत्त्वांमध्येच आहे. हे हिंदुत्व जोपासणं हेच आपले परमध्येय आहे.


जय श्रीराम|

जय मॉ भारती|

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

No comments:

Post a Comment