Thursday, 14 November 2013

हिंदुत्व आणि हिंदू धर्म


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदूंचा सोनेरी इतिहास यावर उदंड ग्रंथसंपदा लिहिली आहे. त्यांचा शब्द न् शब्द स्वतःच्या मातृभूमीबद्दलच्या आणि आर्यांच्या, आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीच्या अभिमानाने ओतप्रोत आहे. त्यांच्याच हिंदुत्व या ग्रंथावर आपण चिंतन सुरू करत आहोत.


हिंदुत्व आणि हिंदू धर्म यांतील अंतर:


हिंदू धर्म या संकल्पनेच्या उदयापूर्वीपासूनच हिंदुत्व ही संकल्पना अस्तित्वात होती. कारण माणसा-माणसांमध्ये धर्म  वेगळा असू शकतो अशी कल्पनाच आर्यावर्तात नव्हती. स्मृतितीत काळ आहे तो जेव्हा आपले आर्य म्हणवून घेणारे पूर्वज सिंधू नदीच्या उपजाऊ प्रदेशात शेती करून राहत होते. त्यातील काही विद्वान प्रगल्भ विचारशक्तीच्या बळावर आत्मस्फुर्त वेदांचा अभ्यास करत होते. स्वतःला उलगडलेले विश्वाचे, स्वतःच्या अस्तित्वाचे कोडे सामान्य प्रापंचिक लोकांना उलगडून देऊन त्यांनाही जीवन जगण्याचा स्वधर्म,  स्वकर्तव्यरूपी प्रशस्त मार्ग शिकवत होते. आर्यावर्तातील सातही नद्यांमुळे बहरलेली ही आर्य संस्कृती स्वतःला या नद्यांच्या कृतज्ञतेपोटी 'सप्तसिंधू' म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागली. तेच अभिधान त्यांनी धारण केले, खरं तर बाहेरील संस्कृतींनाही त्यांना याच नावाने संबोधणे सोयीचे वाटू लागले. तीच त्यांची ओळख होऊन राहिली.


कधी 'सप्तसिंधू' तर कधी 'हप्तहिंदू', कधी फक्त 'सिंधू', तर बहुधा 'हिंदू'च नावाने ओळखले जाणारे ते आर्यच होते. 'सप्तसिंधू' हे जुने नाव थोडा वेळ बाजूला ठेवून आपण आताचे प्रचलित 'हिंदू' हेच नाव ग्राह्य धरू. आपली प्रदेशावरून लोक ओळखण्याची सवय अजून गेली नाही. पहा ना आपण आजही कोकणी, खानदेशी, मालवणी इ. संबोधनेच वापरतो. तसेच हे नाव हिंदू. पण तीच आपली ओळख आहे आणि त्याच नावाने ओळखले जाणारे कितीतरी देवपुरुष येथे होऊन गेले, म्हणूनच या नावाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आम्हीदेखील त्या देवतुल्य पुरुषांप्रमाणे होऊन जावे म्हणूनच त्यांची ओळख तीच आमची ओळख व्हावी हाच आमचा लोभ आहे आणि त्यांच्या चरित्राचे आम्हाला पडलेले वळणच आम्ही 'हिंदुत्व' म्हणून मिरवतो. इतर संस्कृतींच्या आक्रमणानंतर उलट हिंदू धर्म ही संकल्पना अधिकच जोर धरू लागली कारण धर्माचा संप्रदाय म्हणून अर्थ हिंदूच्या मनात कधीच नव्हता, पण इतरांनीच आम्हाला हिंदू धर्मीय म्हणून ओळखायला सुरूवात केली . पण त्याचा परिणाम असा झाला की याच हिंदूंचे एका हिंदू राष्ट्रावरील प्रेम कमी झाले कारण आपण हिंदुस्थानी आहोत हा अभिमान येथील लोकांना बांधून होता आज त्या अभिमानाच्या अभावी प्रजेला नपुंसकत्व आले आहे. खरे तर हिंदुस्थानीच्या जागी हिंदू धर्मी म्हटलं तर काय बिघडलं? त्यात काही वावगं नाही. शिवाय तसे संबोधल्याने बंधुंनो आपल्याला सांप्रदायिकता अथवा पाशवीपणा लिंपणार नाही. हिंदू या नावातच सहिष्णूता आहे, प्रेम आहे, विश्वबंधुत्व आहे, एकत्वाचा सुगंध आहे. तेव्हा अभिमानाने सांगा, 'मी हिंदू आहे, मी हिंदुस्थानी आहे.'


आता हे हिंदुत्व म्हणजे हिंदूपणा नेमका कसा आहे हे पुढच्या लेखात पाहू.
संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

No comments:

Post a Comment