Monday, 11 November 2013

नेहमी बुद्धिचे ऐकावे, मनाचे नाही


बद्ध मनुष्य जीवनात सर्रास मनाचेच म्हणणे ऐकतो व नेहमी तोंडावरच आपटतो. पण त्याची त्याला काही खंत नसते, कारण अज्ञान! ज्ञानही कोणते ऐकावे, कोणते नाही, त्यालाही काही शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे साधा शहाणपणा आपण म्हणू शकतो. पण अज्ञानाला नेहमी चुकिच्याच जाणीवा होऊन मनुष्याचे निर्णय नेहमीच चुकतात. याला ज्ञान घेणे हा एकमेव उपाय आहे.


पण शस्त्र नुसते जवळ बाळगून भागत नाही, तर त्याचा प्रयोग योग्य समयी करावा लागतो. तरच त्या शस्त्राचे असणे सार्थकी लागते. त्याप्रमाणेच ज्ञानही निव्वळ बुद्धीत किंवा पुस्तकांच्या कपाटात असून उपयोगाचे नाही तर त्याचा उपयोगही करणे आवश्यक आहे. हे सर्वांना माहित असले तरी फार क्वचितच माणसे बुद्धीचा उपयोग करतात. इतर मात्र सहजच मनोरथ पूर्ण करून मोकळे होतात. साधकांनी हे प्रयत्नपूर्वक टाळावे. मनाचे म्हणणे ऐकून मनोरथ पूर्ण करणे हे बद्धाचे लक्षण आहे, तर आत्मतत्त्वाच्या अत्यंत निकट असणाऱ्या बुद्धीचे वचन ऐकून ज्ञानोचित निर्णय घेणे हे साधकाचे लक्षण आहे. साधनकाळात प्रथम बुद्धीला ज्ञान उमजते, पण त्या ज्ञानाची परिणती अनुभवात झाली नाही तर ते ज्ञान पोकळच राहते, म्हणूनच बुद्धीचा प्रयोग करायला करा. याच मार्गाने जाऊन बुद्धीच्या पलीकडील ते आत्मतत्त्व अनुभवता येते.

No comments:

Post a Comment