Tuesday, 4 March 2014

राम सद्गुरूची कृपा...

"राम सद्गुरूची कृपा,
जेणे दाखवे स्वरुपा,
धरा सद्गुरू चरण,
जेणे चुकवी जन्म-मरण |"


संतांनी स्थूळ आणि सूक्ष्माहून वेगळे, सत् आणि असत् हून निराळे तरी सर्व रुपांमध्ये जे स्वतः नटलेले आहे, त्या परमात्म्याची भक्ति करावी आणि त्या परमात्म्याने ही स्वतः संताच्याच रुपात अवतरित होऊन ही संतपरंपरा अखंड सुरू ठेवावी, हा विलक्षण खेळ ज्याच्या लक्षात येतो, तोच संतांना परब्रह्मस्वरुप जाणून त्यांना ज्ञानासाठी शरण जातो


      मनुष्याला मन, बुद्धी तसेच इतर ज्ञानेंद्रिये आणि त्यांच्या सीमित शक्ति यांच्या पलीकडे जाऊन त्या परमात्म्याला जाणता येत नाही, तरी तो दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू होऊन संत-सद्गुरू म्हणजेच ऋषीमुनींच्या रुपात अवतरित होतो आणि जीवांना स्वतःची, परमात्मस्वरुपाची ओळख नव्हे तर भेटच घडवून देतो. अशा प्रकारे सतत देवच अवतरित होऊन ही संत-परंपरा अखंड सुरू ठेवतो ! 'एकोहम् बहुस्याम्' या खेळाचाच हा एक भाग !


      हे संत म्हणजेच सगुण ब्रह्म सामान्य लोकांमध्ये अतिसामान्य होऊन राहतात, म्हणून अहंकाराचा आडपडदा ठेऊन कोणी त्या सगुण ब्रह्माला जाणू शकत नाही, पण त्यांच्या चरणी सर्व अहंकार, संकल्प-विकल्प सोडून देऊन जो स्वतःला ओवाळून टाकतो, तो सहजच त्यांचे स्वरुप प्राप्त करतो.  दिवाळीत एका दिव्याने अनेक दिवे आपण लावतो, अगदी तसेच हे ! संताचा एवढा लाभ असेल , तर त्यांचा अपमान जर आपल्याकडून कधी झाला असेल तर त्याची शिक्षा काय असेल, तुम्हीच विचार करा !


      असे असूनही संतांना जाणून न घेता त्यांना नावे ठेवणारे, त्यांच्या साधूपणावर हसणारे लोकही आहेत, एवढ्यावर ते कर्मदरिद्री लोक थांबत नाही, तर भक्तिमार्गाला लागलेल्या लोकांची भक्ति मोडण्यासाठी कट-कारस्थाने करावयास देखील मागे-पुढे पहात नाही. अशांना जर कठोर शब्दात ठोकून काढले नाही, तर आपणच आपला स्वधर्म चुकून पापाचे वाटेकरी होऊ, यात शंका नाही.


        जसा निर्गुण निराकार नित्य आहे, तसाच सगुण साकार आहे, नव्हे नव्हे त्यासाठीच हा सृष्टीचा पसारा आहे, हे जाणून आपणही नरेन्द्रांसारखी ज्ञान आणि संताच्या शोधाची तळमळ जोपासावी व ज्याक्षणी , ज्याचरणी तुम्हाला ईश्वरी कार्याचा प्रत्यय येतो, तेथे स्थिर होऊन साधना साधावी. अहो, नदी असून जो पावसाच्या पाण्याची वाट पाहतो, तो खूळाच की ! त्याचप्रमाणे संतांना सोडून जो दगड-बिंदूंना भजतो, तोही अडाणीच की ! तुम्हीच विचार करा !


Thursday, 9 January 2014

भक्ति शक्तिचा स्त्रोत तर शक्ति भक्तिचे प्रकट रूप




                सर्वव्यापक, सर्वांतर्यामी परमात्म्याची ही सृष्टी ! सृष्टीची रचना करून त्याच सृष्टीतील मनुष्यप्राण्यांनी आपापल्या नियत कर्माचे, विहित कर्माचे म्हणजेच स्वधर्माचे पालन करावे एवढी माफक त्याची अपेक्षा ! पण हे न जाणता कित्येक आसुरी शक्ति स्वधर्माचे पालन करणाऱ्या सज्जनांना ' त्राही भगवन् ' करून सोडतात. स्वतः तर धर्म जाणत नाहीत, पण जाणत्यांना त्यांच्या जाणतेपणाची जणू काही शिक्षा करतात.  आपल्या हाती असलेल्या सत्तेचा, संपन्नतेचा दुरुपयोग करून स्वतःच्या तुच्छ, क्षणिक सुखांचा पाठपुरावा करतात. कारण अज्ञान !  जेवायचे कसे याची समज नसलेल्या लहान मुलासमोरील जेवणाचे ताट तसेच राहते, बहुधा तो सांडासांड करतो, त्याप्रमाणे सत्ता हाताशी असली, सामर्थ्य अंगाशी असले, तरी ज्ञानाशिवाय त्याचा उपयोग करणे कोणाला जमत नाही. सामर्थ्य म्हटले तरी जीव-देहाचेच बल , कधीतरी त्याचा उणेपणा अनुभवाला येणारच !


                 हेच जाणून आपल्या आर्य सनातन वैदिक हिन्दू धर्माच्या तत्त्वांनी शक्तिला आत्मज्ञानाची जोड  असल्यासच त त्या शक्तिला अर्थ आहे, अशी नीती सांगितली. हे केवळ वैदिक वचन नाही, तर हा आपला अनुभवही आहे. आठवून पहा इतिहास ! अर्जुन एकटा धर्मसंस्थापना करूच शकला नसता जर त्याला धर्म काय आणि अधर्म काय हे सांगायला स्वतः भगवान श्रीकृष्ण नसते ! श्रीरामरायांनी देखील सुग्रीव, हनुमंत आणि अवघी वानरसेना यांच्या शक्तिला भक्तिचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. आचार्य चाणक्यांनी देखील धर्म संस्थापनेसाठी चंद्रगुप्त सारखा बळ आणि समर्पण दोहोंमध्ये सर्वश्रेष्ठ असा चंद्रगुप्त शोधून काढला व त्याला धर्माधर्माची शिकवण देऊन त्यातून एक महान सम्राट घडविला. महाराणा प्रताप देखील संत-सद्गुरुंच्याच कृपाशिर्वादाखाली इतिहासात अमर झाला. शिवाजी राजे यांना देखील समर्थ रामदास स्वामींनी आज्ञा केली, 'अवघा हलकल्लोळ करावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा |' आणि शिवरायांनी धर्माची ध्वजा स्वराज्याच्या रूपात उभारून सर्व महाराष्ट्राच्या संत-सज्जनांना जणू गुरुदक्षिणाच दिली.


                   शक्तिचा स्त्रोत भक्ति आहे. अशी भक्तिच्या मुशीतून साकारलेली शक्ति अलौकिक असते, धर्मसंस्थापनेस कारण ठरते. कारण अखंड विजयश्रीसाठी जे धर्माचे अधिष्ठान आवश्यक असते, ते गुरुभक्तिनेच प्राप्त होते. धन्य आहे हा हिंदू धर्म , जेथे ही भक्ति-शक्तिची परंपरा जोपासणारी गुरुशिष्यपरंपरा आजही जपली आहे व राहील.