Tuesday, 4 March 2014

राम सद्गुरूची कृपा...

"राम सद्गुरूची कृपा,
जेणे दाखवे स्वरुपा,
धरा सद्गुरू चरण,
जेणे चुकवी जन्म-मरण |"


संतांनी स्थूळ आणि सूक्ष्माहून वेगळे, सत् आणि असत् हून निराळे तरी सर्व रुपांमध्ये जे स्वतः नटलेले आहे, त्या परमात्म्याची भक्ति करावी आणि त्या परमात्म्याने ही स्वतः संताच्याच रुपात अवतरित होऊन ही संतपरंपरा अखंड सुरू ठेवावी, हा विलक्षण खेळ ज्याच्या लक्षात येतो, तोच संतांना परब्रह्मस्वरुप जाणून त्यांना ज्ञानासाठी शरण जातो


      मनुष्याला मन, बुद्धी तसेच इतर ज्ञानेंद्रिये आणि त्यांच्या सीमित शक्ति यांच्या पलीकडे जाऊन त्या परमात्म्याला जाणता येत नाही, तरी तो दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू होऊन संत-सद्गुरू म्हणजेच ऋषीमुनींच्या रुपात अवतरित होतो आणि जीवांना स्वतःची, परमात्मस्वरुपाची ओळख नव्हे तर भेटच घडवून देतो. अशा प्रकारे सतत देवच अवतरित होऊन ही संत-परंपरा अखंड सुरू ठेवतो ! 'एकोहम् बहुस्याम्' या खेळाचाच हा एक भाग !


      हे संत म्हणजेच सगुण ब्रह्म सामान्य लोकांमध्ये अतिसामान्य होऊन राहतात, म्हणून अहंकाराचा आडपडदा ठेऊन कोणी त्या सगुण ब्रह्माला जाणू शकत नाही, पण त्यांच्या चरणी सर्व अहंकार, संकल्प-विकल्प सोडून देऊन जो स्वतःला ओवाळून टाकतो, तो सहजच त्यांचे स्वरुप प्राप्त करतो.  दिवाळीत एका दिव्याने अनेक दिवे आपण लावतो, अगदी तसेच हे ! संताचा एवढा लाभ असेल , तर त्यांचा अपमान जर आपल्याकडून कधी झाला असेल तर त्याची शिक्षा काय असेल, तुम्हीच विचार करा !


      असे असूनही संतांना जाणून न घेता त्यांना नावे ठेवणारे, त्यांच्या साधूपणावर हसणारे लोकही आहेत, एवढ्यावर ते कर्मदरिद्री लोक थांबत नाही, तर भक्तिमार्गाला लागलेल्या लोकांची भक्ति मोडण्यासाठी कट-कारस्थाने करावयास देखील मागे-पुढे पहात नाही. अशांना जर कठोर शब्दात ठोकून काढले नाही, तर आपणच आपला स्वधर्म चुकून पापाचे वाटेकरी होऊ, यात शंका नाही.


        जसा निर्गुण निराकार नित्य आहे, तसाच सगुण साकार आहे, नव्हे नव्हे त्यासाठीच हा सृष्टीचा पसारा आहे, हे जाणून आपणही नरेन्द्रांसारखी ज्ञान आणि संताच्या शोधाची तळमळ जोपासावी व ज्याक्षणी , ज्याचरणी तुम्हाला ईश्वरी कार्याचा प्रत्यय येतो, तेथे स्थिर होऊन साधना साधावी. अहो, नदी असून जो पावसाच्या पाण्याची वाट पाहतो, तो खूळाच की ! त्याचप्रमाणे संतांना सोडून जो दगड-बिंदूंना भजतो, तोही अडाणीच की ! तुम्हीच विचार करा !


No comments:

Post a Comment