Friday, 11 October 2013

अवघे धरू सुपंथ...


एकमेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ।।


भारतातील सद्यस्थिती पहाता वरील शब्दांचे महत्त्व पटते. कलियुगाची ही मध्यान्हच सुरू आहे. धर्माचा दिवसेंदिवस -हास सुरू आहे. अधर्म माजत आहे. पण धीर धरा. हतबल होऊ नका. कारण पहाटेच्या आधीचा रात्रीचा प्रहर जसा अधिकच काळोखा असतो, तद्वत अधर्म कळस गाठेस्तोवर माजणार आहे. पण एकदा का आपल्या धर्मरूपी रथावर आरूढ होऊन सूर्यनारायण आले की मग पहा कसा अधर्माचा अंधार धर्माच्या तेजापुढे नाहिसा होतो!


पण तोवर आपण काय करावे? तेच जे श्रीरामरायांच्या प्रतिक्षेत माता शबरीने केले, श्रीकृष्णाच्या विरहात गोपींनी केले तेच, आपल्या धर्माचे पालन! धर्मरूपी सुपंथ घट्ट धरून ठेवणे व धर्मालाच आश्रय देणे हेच आता आपले इतिकर्तव्य आहे. धर्म बुडवायला तर नराधम टपलेलेच आहेत, तेव्हा धर्माला व धर्माचे पालन करणा-यांना आश्रय देणे, बहुमत देणे, पाठिंबा देणे हेच आपले कर्तव्य आहे आणि ते आपल्या अवाक्यातही आहे. धर्म ओळखा, धर्मपालकांना ओळखा आणि जोडा, जेवढा धर्म राखता येईल तेवढा राखा. अहो रामाचा सेतू बांधणारे वानर काय शूर होते? पण कार्य श्रीरामांचे होते म्हणून ते सिद्धिस जाणारच होते. तद्वत धर्माची धूरा वाहणारे आपण कोण? पण लक्षात घ्या श्रीरामांच्या कार्यात सहभागी होऊन आपलाच लाभ आहे.


धर्माचे पालन हाच आमचा सुपंथ आणि धर्मपालकांनाच आम्ही सहाय्य करणार! कळत आणि नकळतही! हीच आमची प्रतिज्ञा!

No comments:

Post a Comment