सर्वव्यापक, सर्वांतर्यामी परमात्म्याची ही सृष्टी ! सृष्टीची रचना करून त्याच सृष्टीतील मनुष्यप्राण्यांनी आपापल्या नियत कर्माचे, विहित कर्माचे म्हणजेच स्वधर्माचे पालन करावे एवढी माफक त्याची अपेक्षा ! पण हे न जाणता कित्येक आसुरी शक्ति स्वधर्माचे पालन करणाऱ्या सज्जनांना ' त्राही भगवन् ' करून सोडतात. स्वतः तर धर्म जाणत नाहीत, पण जाणत्यांना त्यांच्या जाणतेपणाची जणू काही शिक्षा करतात. आपल्या हाती असलेल्या सत्तेचा, संपन्नतेचा दुरुपयोग करून स्वतःच्या तुच्छ, क्षणिक सुखांचा पाठपुरावा करतात. कारण अज्ञान ! जेवायचे कसे याची समज नसलेल्या लहान मुलासमोरील जेवणाचे ताट तसेच राहते, बहुधा तो सांडासांड करतो, त्याप्रमाणे सत्ता हाताशी असली, सामर्थ्य अंगाशी असले, तरी ज्ञानाशिवाय त्याचा उपयोग करणे कोणाला जमत नाही. सामर्थ्य म्हटले तरी जीव-देहाचेच बल , कधीतरी त्याचा उणेपणा अनुभवाला येणारच !
हेच जाणून आपल्या आर्य सनातन वैदिक हिन्दू धर्माच्या तत्त्वांनी शक्तिला आत्मज्ञानाची जोड असल्यासच त त्या शक्तिला अर्थ आहे, अशी नीती सांगितली. हे केवळ वैदिक वचन नाही, तर हा आपला अनुभवही आहे. आठवून पहा इतिहास ! अर्जुन एकटा धर्मसंस्थापना करूच शकला नसता जर त्याला धर्म काय आणि अधर्म काय हे सांगायला स्वतः भगवान श्रीकृष्ण नसते ! श्रीरामरायांनी देखील सुग्रीव, हनुमंत आणि अवघी वानरसेना यांच्या शक्तिला भक्तिचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. आचार्य चाणक्यांनी देखील धर्म संस्थापनेसाठी चंद्रगुप्त सारखा बळ आणि समर्पण दोहोंमध्ये सर्वश्रेष्ठ असा चंद्रगुप्त शोधून काढला व त्याला धर्माधर्माची शिकवण देऊन त्यातून एक महान सम्राट घडविला. महाराणा प्रताप देखील संत-सद्गुरुंच्याच कृपाशिर्वादाखाली इतिहासात अमर झाला. शिवाजी राजे यांना देखील समर्थ रामदास स्वामींनी आज्ञा केली, 'अवघा हलकल्लोळ करावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा |' आणि शिवरायांनी धर्माची ध्वजा स्वराज्याच्या रूपात उभारून सर्व महाराष्ट्राच्या संत-सज्जनांना जणू गुरुदक्षिणाच दिली.
शक्तिचा स्त्रोत भक्ति आहे. अशी भक्तिच्या मुशीतून साकारलेली शक्ति अलौकिक असते, धर्मसंस्थापनेस कारण ठरते. कारण अखंड विजयश्रीसाठी जे धर्माचे अधिष्ठान आवश्यक असते, ते गुरुभक्तिनेच प्राप्त होते. धन्य आहे हा हिंदू धर्म , जेथे ही भक्ति-शक्तिची परंपरा जोपासणारी गुरुशिष्यपरंपरा आजही जपली आहे व राहील.