ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय ।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू ।।
ते हे समचरण उभे विटेवरी ।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप ।।धृ।।
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य जे ।
योगियांचे गौप्य परमधाम ।।
जे तेजकांचे तेज जे गुरूमंत्राचे गूज ।
पूजकांचे पूज्य कूलदैवत ।।1।।
जे जीवनाते जीववीते, पवनाते नीववीते ।
जे भक्तांचे उगवीते मायाजाळ ।।
नामा म्हणे ते सुखचि आयते ।
जोडले पुंडलिकाते भाग्य योगे ।।2।।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू ।।
ते हे समचरण उभे विटेवरी ।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप ।।धृ।।
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य जे ।
योगियांचे गौप्य परमधाम ।।
जे तेजकांचे तेज जे गुरूमंत्राचे गूज ।
पूजकांचे पूज्य कूलदैवत ।।1।।
जे जीवनाते जीववीते, पवनाते नीववीते ।
जे भक्तांचे उगवीते मायाजाळ ।।
नामा म्हणे ते सुखचि आयते ।
जोडले पुंडलिकाते भाग्य योगे ।।2।।
सूर्याला आपले तेज पसरवण्यासाठी काही धडपड करावी लागत नाही. फुलाला आपला गंध दरवळवण्यासाठी काही श्रम पडत नाही. तेच देवाच्या भक्तांविषयी सांगता येते. त्यांच्या भक्तीचा झरा त्यांच्या विचारांतून, कर्मातून अविरत वाहत असतो. त्या भक्तिझ-याच्या वाटेत येणारे दगडसुद्धा तरतात, पशू-पक्षीदेखील पाण्याशिवायच तृप्त होतात, तर मग मनुष्याच्या सुदैवाची काय महती सांगणार हो! खरंच, अशा पुण्यश्लोकांचे सान्निध्य ज्या कर्मयोग्यांना लाभते ते ही संताप्रमाणेच पूजनीय आहेत.
संत नामदेव म्हणजे त्या विठ्ठलाच्या प्रेमाचा जणू मूर्तीमंत आविष्कार! पहा, प्रेमरूपा भक्तीचा झरा त्यांच्या या अभंगातून कसा खळखळून वाहत आहे! असा विचार मनात येतो न येतो, तोच तो झरा आपल्या मनरूपी मातीला भक्तीने चिंब भिजवून चित्तामध्ये सहजच विठ्ठलरूपाचा ठसा उमटवून तेथेच लुप्त होतो.
संत नामदेव सोबतच्या भक्तगणांना म्हणतात, ‘हरीभक्तांनो पहा, विठ्ठलाच्या या सगुण रूपाने भक्ती कशी सर्वसामान्यांच्या अवाक्यात आली आहे! ए-हवी ज्ञानी लोकांच्या ज्ञानाचा जो विषय, ध्यानस्थ राहणा-या मुनीजनांचे जे ध्यान ते हे विठ्ठलचरण ज्ञानी व ध्यानी मंडळींना चकवून येथे कसे विटेवर उभे आहे! मग आता डोळे बंद करून ध्यान लावायची काय गरज? डोळे उघडून पहा! हे विठ्ठलाचे समचरण येथेच या वाळवंटात समत्वयोगाची शिकवण देत आहेत. ही सारी पुंडलिकाची करणी! स्वतः देवाला येथे विटेवर तिष्ठत ठेऊन त्याने कित्येक पिढ्यांसाठी भक्तीचा देव्हारा खुला करून ठेवला आहे. विठ्ठलरूपात मूर्तीमंत सुखंच भिमातीरी अवतरले आहे.’
‘अहो! प्रपंच्याच्या मायाजाळाला सुख मानून तूम्ही पुरते नागवले गेले आहात. विठ्ठलरूपाला ओळखा! मग कळेल की सुख ते काय! तपस्व्यांचे जे तप, जपमाळा करणा-यांचा जो जपमंत्र, योग सिद्ध केलेल्या योग्यांचे जे गूह्य, तसेच वैकुंठ-गोलोक-साकेतलोक इ. नावाने ओळखले जाणारे जे परमधाम आहे ना, अहो ते हेच विठ्ठलाचे रूप आहे! तेजस्वी म्हणून प्रसिद्ध ज्या ज्या वस्तू आहेत, त्यांचे जे तेज आहे तसेच सद्गुरूचरणी साधना करून शब्दमंत्राच्या परिणामस्वरूप जे शिष्यात संचारते ते निजस्वरूप हेच विठ्ठलरूप आहे! पाण्यामध्ये जीवन होऊन जे वाहते, वायूमध्ये प्राण होऊन जे प्राणीमात्रांना राखते, एवढेच नाही तर शिका-याने टाकलेल्या जाळ्यात पक्ष्यांचा थवाचा थवा अडकावा त्याप्रमाणे मायाजाळात अडकलेल्या भक्तांचे मायाजाळ उठवते ते विठ्ठलरूपच आहे. अजून एक गूढ आहे, हा विठ्ठलच देव होतो आणि भक्तही तोच होतो आणि देव-भक्ताचे प्रेम सा-या जगाला शिकवतो, जसं निवृत्तीनाथही विठ्ठलच आणि ज्ञानदेवही विठ्ठलच! अहो! मग तूम्हीच सांगा, एवढे आयते सुख जर तुमच्या समोर उभे ठाकले आहे, तर ते लुटण्याऐवजी आपण का बरे तुच्छ संसारसुखासाठी जन्म-मृत्यूची वारी करायची? अहो, पंढरीची वारी करा! या विठ्ठलरूपाला आपलेसे करा! याच सुखानंदाशी पुंडलिकाने आपले नाते जोडले आहे. चला आपणही या सुखानंदात डुंबूया! विठ्ठलाची भक्ती करूया!’