Wednesday, 8 July 2015

गीत दासायन


गीत दासायन
गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.





  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १

प्रसंग १

समर्थ रामदासस्वामींचे नाव माहीत नसणारा भारतीय क्वचितच सापडेल. धर्मकारण आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा हा महापुरुष जांब नावाच्या खेड्यात ठोसर कुलात जन्माला आला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव रेणुका असे होते. सूर्याजीपंतांच्या पूर्वी जवळ जवळ बावीस पिढ्या श्रीरामाची उपासना यांच्या घराण्यात चालू होती. सूर्याजीपंत्र सूर्याचेही उपासक होते. त्यांना प्रभू रामचंद्राच्या कृपेने दोन पुत्र झाले. त्यातला लहान पुत्र हाच नारायण ऊर्फ समर्थ रामदासस्वामी होत. आपल्या अतुल रामभक्तीने आणि असामान्य सदाचरणाने महाराष्ट्रात सर्वत्र प्रभू रामचंद्राची उपासना वाढवून सर्वांना नामस्मरणाचा सोपा मंत्र ज्यांनी दिला ते समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणत असत-
"जय जय रघुवीर समर्थ"
महाराष्ट्राच्या गाभार्‍यातुन दुमदुमले जे सार्थ ।
जय जय रघुवीर समर्थ ॥१॥
जांब गावचा तो कुलकर्णी
ठोसर नामे करि कुलकरणी
सूर्याजी सूर्यासम होता
नाम जयाचे सार्थ ॥१॥
रेणुकासती त्याची भार्या
नित सेवारत पतिच्या कार्या
सुखि संस्कारी एक उणेपण
संतानाविण व्यर्थ ॥२॥
बावीस पिढ्या ठोसर कुळिच्या
अनन्य चरणी प्रभुरामाच्या
प्रसन्न झाले श्रीरघुनंदन
बघुनि भाव निःस्वार्थ ॥३॥
सूर्याजीला दर्शन देउनि
वर दिधला त्या श्रीरामानी
"दोन सद्गुणी सुपुत्र होतिल
करतिल जे वेदार्थ."
ज्येष्ठ पुत्र जो म्हणति श्रेष्ठ त्या ।
बुद्धिमान अन शांतच जात्या ।
मायपित्या आधार जाहला
संसारी सिद्धार्थ ॥५॥
रामनवमिचा शुभ दिन आला ।
प्रभुजन्माची मंगल वेळा
साधुनिया अवतार जाहला
सद्गुरुराज समर्थ ॥६॥
आनंदी आनंद जाहला
साक्षात वायूसुत अवतरला
जनसेवेची अपूर्ण वांच्छा
पुरवुनि होइ कृतार्थ ॥७॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग २

प्रसंग २

समर्थांच्या मातोश्रींचे नाव रेणुका असे होते. परंतु सर्वजण त्यांना राणूबाई असे म्हणत असत. लहानपणी नारायण राणूबाईंच्या बरोबर कथाकीर्तनाला आवडीने जात असे. बुद्धीने अतिशय हुशार परंतु मुलखाचा खट्याळ अशी नारायणाची ख्याती होती. एकदा नारायण हिंडता हिंडता एका शेतात गेला. तेथे जोंधळ्याची मळणी चालली होती. काही पोती भरून ठेवली होती. नारायणाने शेतकर्‍याला विचारले "यातले एक पोते घरी नेऊ का?" यावर शेतकरी विनोदाने म्हणाला, "तुला उचलत असेल तर ने." एवढे ऐकताच नारायणाने सहज लीलेने जोंधळ्याचे भरलेले पोते पाठीवर घेतले आणि मारुतीने द्रोणागिरी आणला त्या आवेशात ते पोते घरी आणून टाकले. शेतकरी पाठोपाठ पळत आला, आणि राणुबाईंना म्हणाला. "तुझ्या लेकाने माझे पोते पळविले. तेव्हा नारायण म्हणाला, "तुमचे पोते तुम्ही घरी घेऊन जा." शेतकर्‍याने पोते उचलले तो त्या जागी दुसरे पोते दिसू लागले. दुसरे उचलले तो तिसरे दिसू लागले. शेवटी शेतकरी दमला. त्याने राणूबाईंना साष्टांग नमस्कार घातला. हा प्रसंग पाहून राणूबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्यांनी नारायणाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, "नारायणा ! आता तू मोठा झालास. अशा खोड्या करू नये." परंतु मनातून मात्र त्यांना असेच वाटत होते, "सानुला ग नारायण."
सानुला ग नारायण
काय सांगु त्याचे गुण
बोबड्या ग बोलाने हा
सांगे मला रामायण ॥ध्रु०॥
सानुले ग याचे ओठ
गोर्‍या भाळि शोभे तीट
नजर तिखट आणि धीट
आवरेना एक क्षण ॥१॥
सानुले धनुष्य बाण
हाति घेई नारायण
म्हणे वधिन मी रावण
आणि सोडी रामबाण ॥२॥
सानुला ग नारायण
मित्र याचे सारेजण
जमवि सर्व वानरगण
खोड्या याच्या विलक्षण ॥३॥
सानुला ग नारायण
आज होतसे ब्राह्मण
याच्या मुंजीसाठी जाण
गोळा झाले आप्तगण ॥४॥
सानुला ग नारायण
सुरू झाले अध्ययन
तोष पावले गुरुजन
पाहुनिया याचे ज्ञान ॥५॥
संपले ग बालपण
थोर झाला नारायण
करूनिया त्याचे लग्न
होउ सर्व सुखी जाण ॥६॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ३

प्रसंग ३

सूर्याजीपंतांचे देहावसान झाल्यानंतर काही दिवसातच "नारायणाचे लग्न करावे" असे राणूबाईंच्या मनात आले. त्यांनी आपला विचार ज्येष्ठ पुत्र गंगाधर यांना सांगितला. श्रेष्ठ म्हणाले, "आई, नारायण हा सामान्य मुलगा नाही. लग्नाचा विषय काढला की तो किती रागावतो हे तुला माहीत आहे." पण राणूबाईंनी ऐकले नाही. एकदा घरातच लग्नाची गोष्ट निघाली तेव्हा नारायण घराबाहेर पडला आणि थेट गावाबाहेर असलेल्या डोहाजवळच्या वटवृक्षावर उंच जागी जाऊन बसला. श्रेष्ठ गंगाधर त्याला नेण्यासाठी आले. त्यांना पाहताच नारायणाने डोहात बुडी मारली. डोहातील खडकावर कपाळ आपटून एक टेंगूळ आले. नारायण बुडताच सर्वत्र हाहाकार उडाला. डोहाच्या काठावरून श्रेष्ठांनी वात्सल्याने हाक मारली, 'नारायणा, वर ये.' ती ऐकताच नारायण वर आला आणि श्रेष्ठांच्या बरोबर घरी गेला. राणूबाईंनी त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. त्या म्हणाल्या, "नारायणा, तू माझे ऐकणार नाहीस का? निदान लग्नाचा अंतरपाट धरलेला तरी मला पाहू दे." नारायणाने आईच्या म्हणण्याला मान दिला. राणूबाईंनी आपल्या भावाच्या कन्येशी नारायणाचा विवाह निश्चित केला. लग्नाचा दिवस उजाडला. नवरा मुलगा बोहल्यावर उभा राहिला आणि सर्वजण म्हणू लागले, "शुभमंगल सावधान."
घोष करिति विप्र सर्व शुभमंगल सावधान
ऐकुनि तो नारायण झाला झणि सावधान ॥ध्रु०॥
सावधान सावधान ।
बावरला नारायण ।
सावरला त्याच क्षणी ।
पुसत मातुला ॥१॥
सावधान मी असता
सावध मज का करिता
सांगा मज घोष वृथा
काय चालला ॥२॥
परिसुनि हे नवल वचन
मुक्तहास्य करिति स्वजन
म्हणती "ही बेडि तुम्हा
आज घातली ॥३॥
आता नच स्वैर गमन
संसारी स्थिर आसन
संपलाच खेळ सर्व
ध्यानि हे धरा" ॥४॥
नारायण करि विचार
काय घडत हा प्रकार
अवधि नुरे परि पळभर
सोडि संभ्रमा ॥५॥
मातृवचन मानियले
यथासांग पाळियले
'झालो मी सावधान
चाललो अता' ॥६॥
अंतरपट उडवि क्षणी
लंघियला मंडप आणि
हां हां हां म्हणत जाइ
गगन भेदुनी ॥७॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ४

प्रसंग ४

'सावधान' हा शब्द कानी पडताच नारायण सावध झाला. त्याने मनाशी विचार केला, आईला दिलेल्या वचनातून आपण मुक्त झालो आहोत. आता सावध व्हायला हरकत नाही. असा विचार करून लग्नमंडपातून नारायण एकदम बाहेर पडला. मंडपात सर्वत्र हलकल्लोळ उडाला. 'अरे नवरा पळाला' असे जो तो एकमेकांना सांगू लागला. भटा-भिक्षुकांची एकच धांदल उडाली. राणूबाईंना काय करावे ते सुचेना. या अनपेक्षित प्रसंगाने त्या अत्यंत व्याकूळ झाल्या. नारायण जो पळाला तो गावाबाहेरील अश्वत्थाच्या झाडावर चढून बसला. राणूबाईंना हे समजताच काळजीने त्यांचे ह्रदय शतशः विदीर्ण झाले. श्रेष्ठांना बरोबर घेऊन त्या वृक्षापाशी आल्या. नारायण अगदी उंच जाऊन बसला होता. ते पाहून राणूबाईचे अंतःकरण घाबरून गेले. त्या सर्व मंडळींना विनवून सांगू लागल्या, "कुणीतरी झाडावर चढून माझ्या नारायणाला खाली आणा हो." पण नारायण इतक्या उंचावर जाऊन बसला होता, की तेथे चढून जाण्याचे धैर्य कुणालाच झाले नाही. शेवटी असह्य होऊन राणूबाई म्हणाल्या, "माझ्या जीविच्या जीवना, खालि येई नारायणा."
माझ्या जीविच्या जीवना
खालि येई नारायणा
नको अंत पाहू माझा
ओढ लागे पंचप्राणा ॥ध्रु०॥
मानिलेस तूही मजला
म्हणुनि मांडिला सोहला
नाहि ओळखीले तुजला
लाडक्या रे नारायणा ॥१॥
लग्न नव्हे आले विघ्न
मनोरथ झाले भग्न
रामनामि तू रे मग्न
राहि सदा नारायणा ॥२॥
आता नाहि रागावणार
मीच तुझे मानणार
आजवरी चुकले फार
राग सोडि नारायणा ॥३॥
तुझ्याविना कैशी राहू
ताटातूट कैसी साहू
नारायणा कोठे पाहू
सांग तूच नारायणा ॥४॥
तात तुझे सोडुनि गेले
दुःख तुला पाहुनि गिळले
तूहि जासि सोडुनि सगळे
साहु कशी नारायणा ॥५॥
तूच एक प्राणविसावा
बावरल्या माझ्या जीवा
का रे दैव साधी दावा
खालि येई नारायणा ॥६॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ५

प्रसंग ५

"खालि येई नारायणा" या आईच्या करुणोद्गाराने नारायण क्षणभर बावरला. त्याला काय करावे हे न सुचल्याने मनाची थोडी चलबिचल झाली. पण दुसर्‍याच क्षणी त्याने निर्णय घेतला आणि मायापाश तोडून तत्काळ दुसर्‍या वृक्षावर उडी मारली. दुसर्‍यावरून तिसर्‍यावर, तिथून चौथ्यावर असे करीत नारायण क्षणभरत दिसेनासा झाला. प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले होते त्या पंचवटी क्षेत्राकडे नारायण गेला. नाशिकशेजारी टाकळी गावात निवान्त ठिकाणी राहावे आणि गोदावरी नंदिनी संगमात उभे राहून तेरा कोटी रामनाम जप व गायत्री पुरःश्चरण करावे असा नारायणाने निश्चय केला. सूर्योदयापासून मध्यान्हकाळापर्यंत कमरेइतक्या पाण्यात उभे राहून अनुष्ठानास सुरवात केली. नंतर मधुकरी मागण्यासाठी नारायण पंचवटीत येत असे. मधुकरीचा श्रीरामाला नैवेद्य दाखवून प्रसाद भक्षण करावा असा क्रम अखंड बारा वर्षे चालू होता. 'बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा" या वचनाप्रमाणे नारायणाने खडतर तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रानी नारायणाला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि कृष्णातीरी जावयास सांगितले. नारायणाबद्दल ज्याला त्याला उत्कंठा आणि ओढ उत्पन्न झाली. आणि प्रत्येकाच्या मनात एकसारखा एकच विचार येऊ लागला, "कोण हा तेजस्वी ब्राह्मण."
कोण हा तेजस्वी ब्राह्मण
करितसे तपाचरण दारुण ॥ध्रु०॥
रोज प्रभाती मजला दिसतो
गोदावरिच्या जली उभा तो
सूर्य उगवता अर्घ्यचि देतो
माध्यान्हीला घरी जाउनी
भिक्षेचे जेवण ॥१॥
दोन प्रहरि ग्रंथांचे वाचन
स्वये करितसे संतत लेखन
प्रभुरायाचे निशिदिन चिंतन
रात्री जाउनि राउळामधे
करित श्रवण कीर्तन ॥२॥
अंगावरती वस्त्रे भगवी
शोभून दिसे तरुण तपस्वी
विनम्र वृत्ती सदा लाघवी
ब्रह्मचर्य अन्‌ गौरकाय ते
कांतिमान यौवन ॥३॥
जटाभार मस्तकी शोभला
जाणतेपणा मुखी विलसला
अवनीवर जणु मुनि अवतरला
वर्षामागुनि वर्षे गेली
तरि न कळे हा कोण ॥४॥
निवास याचा सदा पंचवटी
तपाचरण हा करि गोदातटि
प्रभु रामासम आकृति गोमटि
एकांतामधि नित्य राहतो
करित प्रभू चिंतन ॥५॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ६

प्रसंग ६

एकदा नारायण ध्यानस्थ बसला असता कुणाच्या तरी कंकणाचा नारायणाला आवाज आला. यावरून नमस्कार करणारी स्त्री सुवासिनी आहे असे समजून त्याने आशीर्वाद दिला, "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव." ती स्त्री पतीबरोबर सती जाण्यासाठी निघाली होती. तिने विचारले, "हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढील जन्मीचा?" नारायण म्हणाला, "याच जन्मीचा." आणि त्याने डोळे उघडून पाहिले तो बाई सती जाण्यासाठी निघाली आहे. नारायणाने बाईंना सांगितले, "माझ्या तोंडून गेलेला शब्द रघुपतीचा आहे. तो अन्यथा होणार नाही. मी तुमच्या पतींना एकदा पाहतो." असे म्हणून नारायणाने कमंडलूतील गंगोदक हातात घेतले आणि त्या बाईच्या पतीच्या मृतदेहावर सिंचन केले.त्याबरोबर तिचा पती खडबडून उठून बसला. सर्व लोकांना अत्यंत विस्मय वाटला आणि त्यांनी नारायणाच्या चरणी लोटांगण घातले. नारायण म्हणाला, हे सर्व रघुपतीने केलेले आहे. आपण त्याचे सतत स्मरण केले पाहिजे. म्हणजे तो आपल्याला कधीही विसरणार नाही. "नित बोला तुम्हि हरिचे नाम । श्रीराम जयराम जयजयराम ।"
नित बोला तुम्हि हरिचे नाम
श्रीराम जयराम जयजयराम ॥ध्रु०॥
रामनाम उच्चारण सोपे
निशिदिनि स्मरता जळतिल पापे
अघम वासना थरथर कापे
सतत स्मरा तुम्हि प्रभुचे नाम ॥१॥
सगुण रूप श्रीराम दयाघन
घडता दर्शन पावन जीवन
भाव दाटले भरले लोचन
सतत करा नामामृत पान ॥२॥
निर्मल भाव प्रभूवर ठेवा
भवसागरि तो एक विसावा
सकल सुखाचा एकच ठेवा
सोडु नका नित चिरसुख धाम ॥३॥
प्रभुनामाची जडता गोडी
तोचि एक इहपर सुख जोडी
मोहपाश तो सहजचि तोडी
हरिनामचि त्या सौख्यनिधान ॥४॥
वाल्मिकि तरला नामबलाने
रचिले रामायण भाग्याने
कविकुलगुरु मानिति अभिमाने
भवदुख वारिल प्रभुचे नाम ॥५॥
उठता बसता नाम स्मरावे
राघवरूप निरंतर ध्यावे
सकल चराचरि त्यास पाहावे
तोच जगाचा चिरविश्राम ॥६॥
भक्तवत्सला मेघश्यामा
श्रीरघुनंदन हे श्रीरामा
तव नामाचा अगाध महिमा


क्षणहि न विसरो मंगल नाम ॥७॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ७

प्रसंग ७

टाकळीच्या सर्व लोकांनी नारायणाचे सामर्थ्य ओळखले आणि याच ठिकाणी नारायणाला 'समर्थ' अशी पदवी प्राप्त झाली. या वेळेपासून 'श्रीराम जयराम जयजयराम' या त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह द्यायला समर्थांनी सुरुवात केली. बारा वर्षांची खडतर तपश्चर्या संपत आली तेव्हा प्रभू रामचंदांनी समर्थांना कृष्णातीरी जाण्याचा आग्रह सुरू केला. शिवाच्या अंशापासून भोसल्यांच्या कुळात शिवाजीचा जन्म झाला आहे. त्याला समर्थांनी सहाय्य करावे असे प्रभू रामचंद्रांनी सांगितले. समर्थांनी बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर तीर्थाटन करण्याचा विचार केला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतातील सर्व परिस्थिती प्रत्यक्ष अवलोकन करावी हा त्यांचा मनातला हेतू होता. त्याचप्रमाणे भारतातील सर्व देवस्थाने आणि तीर्थक्षेत्रे त्यांनी पाहिली. सर्व प्रवास पायी केला. त्यामुळे त्यांच्या तीर्थयात्रेला बारा वर्षांचा कालावधी लागला. वेगवेगळ्या प्रांतातून निरनिराळ्या भाषा त्यांनी अवगत केल्या आणि त्यात कवने रचली. "द्वादश संवत्सरे आचरुनी, तीव्र तपचरणा, निघाले समर्थ तीर्थाटना."
द्वादश संवत्सरे आचरुनी
तीव्र तपाचरणा ।
निघाले समर्थ तीर्थाटना ॥ध्रु०॥
रामप्रभूंची आज्ञा मिळता
मानुनि शिरसावंद्य तत्त्वता
निजव्रताची करुनि सांगता
वंदुनि नारायणा ॥१॥
रामदास पद जेथे पडती
ती ती क्षेत्रे पावन होती
अवघे भाविक दर्शन घेती
घालूनि लोटांगणा ॥२॥
काशीक्षेत्री श्रीशिवदर्शन
गंगास्नाने नरतनु पावन
प्रभुरायाचे अविरत चिंतन
करुन ध्यानधारणा ॥३॥
क्षेत्र अयोध्या प्रभुपद पावन
राधा-कृष्णांचे वृन्दावन
मथुरा गोकुळ नेत्री देखुन
साक्षात श्रीकृष्णा ॥४॥
हिमालयामधि कैलासेश्वर
दक्षिणेकडे श्रीरामेश्वर
नमुनी बद्रीकेदारेश्वर
बद्रीनारायणा ॥५॥
पाहिलि पुढती पुरी द्वारका
उज्जयिनी सोमनाथ लंका
सेतुबंध देखिला न शंका
राम वधी रावणा ॥१॥
अखंड भारत पायी फिरले
जन मन जातीने पारखले
असे भारती एकच झाले
रामदास जाणा ॥७॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ८

प्रसंग ८

तीर्थाहून परत आल्यावर समर्थ पंचवटीस आले. तीर्थयात्रेचा समग्र अहवाल प्रभू रामचंद्रांना सादर केला. तीर्थयात्रेचे सर्व पुण्य प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केले. यानंतर कृष्णातीरी संचार करण्यासाठी समर्थ निघाले. अंगावर भगवी वस्त्रे आणि खांद्यावर गलोल अशा वेषात ते पैठण क्षेत्रातील वाळवंटात फिरत होते. तिथल्या काही ब्राह्मण मंडळींनी त्यांची कुचेष्टा करावी म्हणून आकाशातून उडणार्‍या घारीला गलोलीने नेम मारून पाडावयास सांगितले. समर्थांनी घार पाडली. त्याबरोबर त्याच ब्राह्मणांनी हिंसा केल्याबद्दल समर्थांना सक्षौर प्रायश्चित्त घ्यायला लावले. प्रायश्चित्तानंतरही घार जिवंत होत नाही हे पाहुन समर्थांनी ब्राह्मणांना विचारले, "प्रायश्चित्ताचा काय उपयोग झाला?' ब्राह्मण हसू लागले. तेव्हा समर्थांनी घारीला हातात घेतले आणि प्रभू रामचंद्राचे स्मरण करून तिला सांगितले, "पूर्वीप्रमाणे आकाशात विहार कर." त्याबरोबर घार उडून गेली. सर्व ब्राह्मण समर्थांना शरण्गेले. "अचेतनासी करी सचेतन, दावि चमत्कार, त्याविना कुठे नमस्कार."
अचेतनासी करी सचेतन,
दावि चमत्कार, त्याविना
कुठे नमस्कार
प्रभुरायाची सर्व लेकरे
अडखळती जगि नित अविचारे
भवसागरि बुडताति बिचारे
गुरु एकच आधार ॥१॥
नरतनु दुर्लभ लाधलि दैवे
सार्थक नरजन्माचे व्हावे
राघवरूप निरंतर ध्यावे
कोण दुजा आधार॥२॥
जनसेवेचे बांधुनि कंकण
सखोल केले स्वये निरीक्षण
निजधर्माचे करि संरक्षण
दावुनि साक्षात्कार ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ९

प्रसंग ९

लोकसंग्रह करण्यासाठी समर्थांनी आपल्या योगसिद्धीच्या बळावर अनेक ठिकाणी चमत्कार केले. पैठण क्षेत्रात समर्थांची रसाळ किर्तने सुरू झाली. असंख्य लोक त्यांचे कीर्तन ऐकावयास येत असत. त्यातच आंबड प्रांतातला नित्य येणारा एक ब्राह्मण समर्थांच्याकडे टक लावून पाहत असे. त्याला वाटे, यापूर्वी समर्थांना आपण कुठेतरी पाहिले आहे. आणि एक दिवस त्याच्या मनात शंका आली. लहानपणी लग्नमंडपातून पळून गेलेला सूर्याजीपंतांचा नारायण तोच हा असावा. कीर्तनानंतर त्याने समर्थांची भेट घेतली आणि शंका निरसन केली. तो समर्थांना म्हणाला, "आपण स्वधर्मासाठी हरिकीर्तन करीत गावोगाव फिरता, हे योग्य आहे. पण आपली वाट पाहून पाहून आपल्या मातोश्रींचे डोळे गेले. त्यांना आपण भेटावे." समर्थांनी दुसर्‍याच दिवशी आपल्या जन्मगावी जावयाचे ठरविले. गावात शिरताच मारुतिरायाचे दर्शन घेतले. आपल्या घराच्या अंगणात रामनामाचा जयजयकार केला. तो ऐकून श्रेष्ठपत्‍नी भिक्षा घालण्यासाठी बाहेर आल्या. तेवढ्यात समर्थ ओसरीवर आले होते. ते म्हणाले. "हा भिक्षा घेणारा गोसावी नाही." हे शब्द ऐकताच राणूबाई म्हणाल्या, "माझा नारोबा आला की काय?" समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून हात फिरविला. त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्या म्हणाल्या, "ही काय रे भुतचेष्टा?" यावर समर्थ म्हणाले, "तेचि भूत गे माय."
होते वैकुंठीच्या कोनी
शिरले अयोध्या भुवनी
लागे कौसलेल्च्या स्तनी
तेचि भूत गे माय ॥ध्रु॥
आता कौशिक राउळी
अवलोकिता भयकाळी
ताटिका ते छळोनी मेली । तेचि० ॥१॥
मार्गी जाता वनांतरी
पाय पडता दगडावरी
पाषाणाची झाली नारी । तेचि० ॥२॥
जनकाचे अंगणी गेले ।
शिवाचे धनु भंगले ।
वैदेही अंगी संचरले । तेचि० ॥३॥
जेणे सहस्त्रार्जुन वधिला
तोहि तत्काळची भ्याला
धनू देऊनी देह रक्षिला ।तेचि० ॥४॥
पितयाचे भाकेशी
कैकयीचे वचनासी
मानुनि गेले अरण्यासी । तेचि० ॥५॥
चौदा संवत्सरे तपसी
अखंड हिंडे वनवासी
सांगाते भुजंग पोशी । तेचि० ॥६॥
सुग्रीवाचे पालन
वालीचे निर्दालन
तारी पाण्यावर पाषाण । तेचि० ॥७॥
रक्षी मरणी बिभीषण
मारी रावण कुंभकर्ण
तोडी अमराचे बंधन । तेचि० ॥८॥
वामांगी स्त्रियेला धरिले
धावुनी शरयूतीरा आले
तेथे भरतासी भेटले । तेचि० ॥९॥
सर्वा भूतांचे ह्रदय
नाम त्याचे रामराय
रामदास नित्य गाय । तेचि० ॥१०॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १०

प्रसंग १०

मातोश्रींच्या आणि बंधूंच्या प्रेमळ सहवासात काही दिवस काढल्यानंतर त्यांची अनुज्ञा घेऊन समर्थ पुन्हा संचाराला निघाले. मसूर प्रांतात मुक्काम असताना एका वाड्यात ते भिक्षेसाठी गेले. रामनामाचा जयजयकार केला. मालकीणबाईने बाहेर येऊन त्यांना बजावले. "भरल्या घरात 'राम राम' म्हणू नकोस." असा क्रम दहा दिवस चालला. बाई संताप सोडीना, समर्थ शांतपणा सोडीनात. शेवटी एक दिवस जयजयकारानंतरही बाई आली नाही म्हणून समर्थांनी पुन्हा जयजयकार केला तेव्हा बाईंनी समर्थांना सांगितले की. "घरच्या मालकांना मुसलमानी अधिकार्‍याने कैद करून विजापुरास नेले आहे." समर्थ म्हणाले, "आजपासून अकराव्या दिवशी तुमचे पती सुरक्षित घरी येतील. त्याबद्दल तुम्ही मला रामनामाची भिक्षा घाला." समर्थ तेथून निघाले आणि विजापूरच्या दरबारात प्रकट झाले. त्यांनी बाईंच्या पतींना सोडविले आणि त्यांच्यासह मसूरच्या वेशीपर्यंत आले. पतीला पाहून बाईंना आनंद झाला. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना आपण नाही नाही ते बोललो असे वाटून त्यांनी समर्थांचा धावा सुरू केला. "रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी."
रामदास गुरु माझे आई
मजला ठाव द्यावा पायी ॥ध्रु॥
गतजन्मीचे भाग्य उदेले
म्हणुनी सद्गुरु दारी आले
दैवे दिधले कर्मे नेले
काय करू मी चुकले बाई ॥१॥
मज मूढेला नाही कळले
मजवरुनी मी जग पारखिले
दुर्वचने मी स्वये बोलले
कधी भेटतिल कवण्या ठायी ॥२॥
क्षमा करा मज हे गुरुमाउली
करी दयाळा कृपा साउली
वाट पाहुनी दृष्टी थकली
धाव सत्वरी दर्शन देई ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग ११

प्रसंग ११

यानंतर समर्थांनी सतीबाईंना आणि बाजीपंतांना दर्शन देऊन अनुग्रह दिला. अशा तर्‍हेने संचार करीत करीत समर्थ कोल्हापुरी गेले असताना पाराजीपंत यांच्या घरी भोजनास गेले. त्या ठिकाणी त्यांचा भाचा अंबाजी समर्थांना आवडला. त्याला समर्थांनी आपल्या संप्रदायात ठेवून घेतला. मसूर गावी रामाचा उत्सव चालू असताना मिरवणूकीच्या रस्त्यावर एक वृक्षाची फांदी आड येउ लागली. समर्थांनी अंबाजीला सांगितले, "फांदीच्या शेंड्याकडे बसून फांदी तोड." अंबाजीने समर्थांच्या आज्ञेप्रमाणे फांदी तोडली. त्यामुळे त्या फांदीसह वृक्षातळी असलेल्या विहिरीत अंबाजी पडला आणि बुडाला. संध्याकाळी काठावरून समर्थांनी त्याला हाक मारली आणि विचारले, "अंबादासा, आहेस तेथे कल्याणरूप आहेस ना?" अंबादासाने 'होय' म्हणताच समर्थांनी त्याला वर बोलाविले. त्याला जवळ घेतले. त्याच्य पाठीवरून हात फिरविला आणि शिष्याची कसोटी पूर्ण झाली असे समजून त्या दिवसापासून त्याचे नाव कल्याण असे ठेवले. समर्थांच्या सर्व शिष्यात एकनिष्ठ आणि सदगुरुसेवारत म्हणून कल्याणाची प्रसिद्धी आहे. समर्थांचे बहुतेक लेखन कल्याणांनीच लिहिले आहे. "सद्गुरुचरणी लीन जाहला शिष्योत्तम जाण । असा हा एकच कल्याण."
सद्गुरुचरणी लीन जाहला
शिष्योत्तम जाण ।
असा हा एकच कल्याण.
पाराजीपंतांचा भाचा
अंबाजी करवीर क्षेत्रिचा
लाभ जाहला गुरुकृपेचा
प्रथमदर्शनी जाण ॥१॥
सदैव गुरुच्या समीप राही
सेवारत जो भक्ति प्रवाही
अन्य जयाला भानच नाही
त्यास कशाची वाण ॥२॥
अनेक शिष्योत्तम दासांचे
त्या शिष्याग्रणि नाम तयाचे
सार्थक केले नरजन्माचे
पणा लावुनी प्राण ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १२

प्रसंग १२

रंगनाथस्वामींच्या निगडीहून समर्थ परत चालले होते. वाटेत अंगापूरजवळ कृष्णातीरावर स्नानसंध्येसाठी थांबले असता डोहातुन ध्वनी आला, "तुम्हाला पाहिजे असलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती या डोहात आहे." समर्थांनी तत्काळ डोहात उडी मारली आणि मूर्ती बाहेर काढली. मूर्ती झोळीत घालून ते चाफळ गावी गेले. पाहिजे तसा एकान्त आणि मनोहर वनश्री यामुळे समर्थांना हे गाव पसंत पडले. समर्थांनी या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना केली. या गावाशेजारीच चार मैलांवर समर्थंची रामघळ ही प्रसिद्ध घळ आहे. या मंदिरासाठी समर्थांनी छत्रपतींच्याकडून एका किर्तनकाराने बिदागि म्हणून मिळविलेले तीनशे होन खर्च केले. मांडव्य नदीच्या दक्षिण तीरावर हे मंदिर आहे. या मंदिरासमोर समर्थांच्या अकरा मारुतीपैकी दास मारुती आहे. समर्थांचे या गावी पुष्कळ दिवस वास्तव्य होते. नंतरच्या काळात समर्थ सज्जनगड आणि चाफळ या दोनही ठिकाणी राहत असत. समर्थांनी स्वतः स्थापन केलेली अशी रामाची मूर्ती आणि ज्या मूर्तीला समर्थांच्या हातून पूजाअर्चा लाभली अशा या मूर्तीचे प्रत्येक भारतवासीयाने एकदा तरी दर्शन घेतलेले असावे. "उजळले भाग्यच भक्तांचे, बांधिले मंदिर रामाचे."
उजळले भाग्यच भक्तांचे,
बांधिले मंदिर रामाचे ॥ध्रु॥
अंगापुरिच्या कृष्णाडोही ।
श्रीरामाचे ध्यान प्रवाही ।
रामदास शोधिती लवलाही
गवसले परब्रह्म साचे ॥१॥
गर्द सभोत हरित तृणांकुर ।
भवति विखुरले रम्य गिरीवर ।
त्यामधि शोभे रघुपति मंदिर ।
हिर्‍याला कोंदण पाचूचे ॥२॥
सगुण प्रभूचे दर्शन होता ।
मिळे मानवा सहज मुक्तता ।
नरजन्माची हो सार्थकता ।
धन्यता ब्रह्मपदी नाचे ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १३

प्रसंग १३

समर्थांचा संचार चालू असतानाच महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग चालू होता. एकदा महाराज महाड गावी असताना एका कीर्तनाला गेले. कीर्तनकारांनी 'सद्गुरुकृपा' हा विषय रसाळपणे मांडला. शिवाजीमहाराजांना सद्गुरुकृपेची ओढ लागून ते तुकाराममहाराजांना भेटले. परंतु त्यांनी शिवाजीमहाराजांना समर्थांचा अनुग्रह घ्यावा असे सांगितले. समर्थांच्या भेटीसाथी महाराज प्रतापगडाहून चाफळच्या मठात गेले. त्या ठिकाणी समर्थ नव्हते. चाफळशेजारी शिंगणवाडी या ठिकाणी दासबोध लेखनाचे काम चालू होते. छत्रपती त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी समर्थचरणी लोटांगण घातले. समर्थांनी त्यांच्या अनन्य भक्तीकडे पाहून त्यांणा अनुग्रह दिला. शिवाजीमहाराजांनी समर्थांची पूजा केली. अनुग्रहप्रसंगी समर्थांनी महाराजांच्या शेल्यात श्रीफल, मूठभर माती, मूठभर खडे आणि थोडीशी घोड्याची लीड असा प्रसाद दिला. प्रभू रामचंद्रांचा प्रसाद झाल्यावर समर्थांनी त्यांना निरोप दिला. परंतु शिवाजीमहाराज म्हणाले, "आपल्या सहवासात सतत राहावे असे मला वाटते." यावर समर्थांनी राजांना क्षात्रधर्म सांगितला, "श्रीशिवाचे अंश तुम्ही, राजधर्मा स्वीकरा, अन्‍ क्षात्रधर्मी आचरा."
श्रीशिवाचे अंश तुम्ही ।
राजधर्मा स्वीकरा
अन् क्षात्रधर्मी आचरा ॥ध्रु॥
मातला हा म्लेच्छ सारा
दंडुनी त्या दूर सारा
जागवा जनता जनार्दन
वर्म आपुला उद्धरा
अन द्या तयाला आसरा ॥१॥
मर्द तितुका मेळवावा
संतरक्षणी तो खपावा
गाइ-ब्राह्मण धर्मपालन
कार्य अवतारी करा
न्यायनीतीला वरा ॥२॥
रघुपतींची हीच आज्ञा
मान शिरसावंद्य सूज्ञा
आमुचे आशीष तुजला
धन्य कुल आपुले करा
अन उद्धरा सारी धरा ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १४

प्रसंग १४

समर्थांचा उपदेश श्रवण करून शिवाजीमहाराज प्रतापगडावर परतले. समर्थ संचार करीत करीत एकदा पंढरपुरला गेले. पांडुरंगाचे दर्शन घेण्याकरिता ते मंदिराच्या गाभार्‍यात गेले आणि दर्शन घेतल्यानंतर "जयजय रघुवीर समर्थ" असे सहजोद्गार त्यांच्या तोंडातून निघाले. मूर्तीशेजारी बडवे मंडळी होती. त्यांच्या कानावर ते शब्द पडताच त्यांनी समर्थांना घेरले, आणि पांडुरंगासमोर पांडुरंगाचाच जयजयकार केला पाहिजे असे सांगितले. समर्थ म्हणाले, "पांडुरंग आणि राम ही दोन वेगवेगळी दैवते असली तरी परमेश्वर एकच आहे. म्हणून आपण असा विषाद मानण्याचे कारण नाही."परंतु बडवे मंडळी ऐकावयास तयार होईनात, आणि पांडुरंगाचा जयजयकार केल्याशिवाय जाऊ देईनात. "अनेकी सदा एक देवासि पाहे" या समर्थांच्याच उक्तीप्रमाणे समर्थांनी बडवेमंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते पांडुरंगाच्या मूर्तीसमोर अनन्यभावाने उभे राहिले. त्यांनी पांडुरंगाला आळवायला सुरुवात केली. "इथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघःश्यामा."
इथे कारे उभा श्रीरामा
मनमोहन मेघ श्यामा ॥ध्रु॥
काय केली शरयू गंगा
इथे आणिली चंद्रभागा
काय केली अयोध्यापुरी
इथे वसविली पंढरी ॥१॥
काय केले वानरदळ
इथे जमविले गोपाळ
काय केले धनुष्यबाण
कर कटावरी ठेवून ॥१॥
काय केली सीतामाई
इथे राही रखुमाबाई
रामदासी ऐसा भाव
तैसा झाला पंढरिराव ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १५

प्रसंग १५

अशा रीतीने पांडुरंगाची आळवणी करताच गाभार्‍यातील देखावा एकदम बदलून गेला पांडुरंगाच्या मूर्तीच्या ठिकाणी धनुर्धारी रामचंद्राची मूर्ती दिसू लागली. समर्थांचा कंठ सद्‌गदित झाला आणि त्यांनी प्रभू रामचंद्राच्या पायावर डोके ठेवले. सर्व बडवेमंडळी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाली आणि सर्वजण समर्थांना शरण गेली. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेसाठी अनेक किल्ले शत्रूकडून जिंकून घेतले. आणि निरनिराळ्या किल्ल्यांचे बांधकाम सुरू केले. हजारो गवंडी, सुतार, पाथरवट मंडळी खपत होती. ते दृश्य पाहून शिवरायांच्या मनात विचार आला की, "या सर्वांचा पोशिंदा मीच आहे." समर्थांनी हे अंतर्ज्ञानाने हे जाणले आणि तत्काळ ते किल्ल्यावर प्रगट झाले. शिवराय आणि समर्थ बरोबर चालत असताना वाटेतला एक धोंडा समर्थांनी फोडावयास लावला. त्या धोंड्याच्या आतल्या बाजूला मुठीएवढी पोकळी होती आणि पोकळीतील पाण्यात एक जिवंत बेडकी होती. समर्थ म्हणाले, "शिवबा ! खरोखरीच तू या त्रैलोक्याचा पोशिंदा आहेस." शिवाजीमहाराज मनातून उमगले आणि त्यांनी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले. "जनहो ऐका शिवराज्यातिल नवलकथा एक, पाषाणाच्या पोटि निपजला सजीव मंडूक."
जनहो ऐका शिवराज्यातिल नवलकथा एक,
पाषाणाच्या पोटि निपजला सजीव मंडूक ॥ध्रु०॥
करुनी यवनांचे निर्दालन
महाराष्ट्र-भू केली पावन
दुर्गम दुर्गहि घेती जिंकुन
गर्जती 'हरहरमहादेव' अन दाविती यमलोक ॥३॥
किल्ल्यावर तटबंदी करिती
ढासळले तट पुन्हा बांधिती
सहस्त्रावधी मजूर खपती
छत्रपती जातीने करिती देखभाल देख ॥२॥
जिकडे तिकडे किल्ल्यावरती
घाम गाळुनी कामे करती
शिवबांच्या मनि विचार येती
'पालनपोषण कर्ता यांचा असे मीच एक" ॥३॥
अहंकार जाहला शिवाला
अंतर्ज्ञाने समजे गुरुला
झडकरि निघती शिवभेटीला
"जयजय रघुवीर" समर्थांची श्रवणि येइ भाक ॥४॥
शिवबा गुरुचरणांना वंदिति
विनम्रभावे कुशल विचारिति
बोलत बोलत सवे चालती
मार्गावरती मधेच दिसला शिलाखंड एक ॥५॥
शिला देखुनी समर्थ वदती
"कशास मार्गी ही आपत्ती
खंडुनि टाका तिजला संप्रति ।"
द्विखंड झाली शिला घालिता सबलघाव एक ॥६॥
त्या शीलेच्या पोटे दिसली
मुठीएवढी सजल पोकळी
जलामधे त्या जिवंत पाहिली
सान बेडकी, आश्चर्याने स्तिमित सर्व लोक ॥७॥
समर्थ म्हणती "बा शिवराया
धन्य धन्य तव अद्‌भूत किमया
जड पाषाणी रक्षिसि काया
तूच खरोखर त्रैलोक्याचा सर्वेश्वर एक ॥८॥
ऐकुनि शिवबा तटस्थ झाले
पश्चात्तापे मनी विरमले
समर्थचरणी लीन जाहले
अहंकार वितळला देखुनी, सद्गुरु निःशंक ॥९॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १६

प्रसंग १६

या प्रसंगी समर्थांनी स्वतः केलेली पद्यरचना लोकप्रसिद्ध आहे.
आम्हि काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो ॥ध्रु०॥
बांधिले घुमट किल्ल्याचे तट
तयाला फुटती पिपळवट
तेथे कोण लावितो मोट
बुडाला पाणी घालितो ॥१॥
खडक फोडिता सजिव रोडकी
पाहिली सर्वांनी बेडकी
सिंधू नसता तियेचे मुखी
पाणी कोण घालितो ॥२॥
नसता पाण्याचे बुडबुडे
सदासर्वदा गगन कोरडे
दास म्हणे जीवन चहूंकडे
पाहुनी सडे पीक उगवितो ॥३॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १७

प्रसंग १७

छत्रपती शिवाजीमहाराजांचा अहंकार नाहीसा झाल्याचे पाहून समर्थांना आनंद झाला आणि समर्थ स्वस्थानी परतले. काही दिवसांनंतर समर्थ महाबळेश्वरी असताना शिवाजीराजे त्यांच्या दर्शनासाठी आले. समर्थांनी ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आधीच जाणली होती म्हणून ते अरण्यात निघून गेले होते. छत्रपतींनी स्वामींची चौकशी केली आणि त्यांच्या शोधासाठी एकटेच अरण्यात निघाले. बराच काळ अरण्यात घालविल्यानंतर शिवाजीमहाराज निराश झाले. परंतु दर्शन झाल्याशिवाय परतावयाचे नाही या दृढनिश्चयाने तसेच पुढे चालले. शेवटी अत्यंत करुण स्वरात विव्हळणारे समर्थ एका वृक्षाखाली बसलेले त्यांना दिसले. शिवबांनी जवळ जाऊन नम्रतेने त्यांना विचारले तेव्हा समर्थ म्हणाले, "हे माझे दुखणे असाध्य आहे. यावर औषध नाही. वाघिणीचे दूध एवढे एकच औषध उपयोगी पडणारे आहे, पण ते कसे मिळणार?" असे म्हणून समर्थ पुन्हा विव्हळू लागले. छत्रपती तसेच अरण्यात शिरले आणि वाघाच्या गुहेपाशी जाऊन थांबले. आपल्या गुहेपाशी माणूस आलेला पाहून वाघिणीने शिवबांना ओरबाडले. छत्रपतींनी वाघिणीला नम्रपणे विनंती केली आणि सांगितले, "माझ्या गुरुजींसाठी थोडेसे दूध दे." वाघिणीचे दूध काढून शिवबा परत फिरले तोच त्यांच्या कानावर "जयजय रघुवीर समर्थ" अशी समर्थांची प्रेमळ वाणी पडली. "सदैव सद्गुरुचरणी वाहिले जीवन शिवबांचे, काढिले दूध वाघिणीचे."
सदैव सद्गुरुचरणी वाहिले जीवन शिवबांचे
काढिले दूध वाघिणीचे ॥ध्रु०॥
गुरुदर्शन मज नित्य घडावे
गुरुसेवेतच सतत रमावे
अशी मनीषा अविरत नांदवि, मानस शिवबांचे ॥१॥
ध्यास मानसी धरुन निघाले
समर्थाश्रमी शिवबा आले
परी न त्यांना दर्शन घडले गुरुपदकमलांचे ॥२॥
एका जागी कधी न वसती
भुवनत्रयि जे नित संचरती
कसे घडावे दर्शन सुखकर । सहज सुलभ त्यांचे ॥३॥
निबिड वनांतरि शोधशोधिले
अवचित त्यांना सन्मुख दिसले
व्यथित व्याधिने व्याकुळलेले ध्यान समर्थांचे ॥४॥
धावत शिवबा सन्निध गेले
गुरुचरणांना स्पर्शुनि वदले
आज असे का मुख विन्मुखले सद्गुरुराजांचे ॥५॥
स्वामी म्हणती ऐक नरेशा
कोण निवारिल रे यमपाशा
नुरली आशा औषध दुर्लभ दूध वाघिणीचे ॥६॥
त्वरित निघाले श्रीशिवभूपति
निबिड वनांतरि व्याघ्रगुहेप्रति
घोर गर्जना ऐकुनि स्मरती चरण समर्थांचे ॥७॥
वाघिण झेपावे शिवबावरि
क्रोधावेशे झोंबे शरिरि
ढळला परि नच नृपति तिळभरी फल दृढ श्रद्धेचे ॥८॥
गुरुभक्तीची सीमा झाली
निष्ठुर वाघीण कपिला बनली
प्रकटुनि पाहति श्रीगुरुमाउली कौतुक शिष्याचे ॥९॥


  गीत दासायन

मुख्यपृष्ठ   प्रसंग १८

प्रसंग १८

सुमारे सहा वर्षे राज्यकारभार करून छत्रपती शिवाजीमहाराज निजधामाला गेले. शिवराय गेल्यापासून समर्थही आपल्या जाण्याची भाषा बोलू लागले. छत्रपती शिवाजी आणि रामदासस्वामी यांचा सुरेख संगम म्हणजे साक्षात शक्ती आणि युक्ती यांचा एकजीव होता. शक्ती गेल्यावर नुसत्या युक्तीला मागे राहून काय करायचे आहे? समर्थांनी चाफळला जाऊन प्रभू रामचंद्र आणि मारुती यांना भेटून प्रार्थना केली. शिष्यपरंपरेची निरवानिरव केली. चाफळ खोर्‍यातील वृक्षाचा, घळींचा आणि पर्वतांचा शेवटचा निरोप घेऊन समर्थ सज्जनगडावर आले. आता गडावरून खाली उतरायचे नाही असा त्यांनी निर्धार केला. निर्याणापूर्वी सहा महिने समर्थांनी अन्न वर्ज्य केले आणि देवळाच्या ओवरीत राहू लागले. माघ वद्य नवमिचा दिवस उजाडला. समर्थांनी श्रीरामाला साष्टांग नमस्कार केला. दर्शनासाथी जमलेल्या मंडळींना दर्शन दिले. अक्कांनी विनंती केल्यावरुन साखरपाणी घेतले आणि पायात खडावा घालून ते रघुपतीकडे दृष्टी लावून बसले. यानंतर समर्थांनी रामनामाचा तीन वेळा मोठ्याने गजर केला. सर्वत्र एकदम शांतता पसरली आणि त्याच क्षणी समर्थांच्या मुखातून दिव्य तेज निघून श्रीरामरायांच्या मुखात प्रविष्ट झाले. अशा रीतीने या महापुरुषाचे निर्याण झाले. "रामदास गुरु माऊली, घ्या हो पुनरपि अवतारा, कोण तुम्हाविण समर्थ दुसरा या जगदोद्धारा."
रामदास गुरु माऊली, घ्या हो पुनरपि अवतारा
कोण तुम्हाविण समर्थ दुसरा या जगदोद्धारा ॥ध्रु०॥
समर्थ नसती म्हणून आम्ही
जगती असमर्थ
असमर्थांना जगी न थारा
तळमळती व्यर्थ
व्यर्थचि आमुचे जीवन सदया
आम्हाला तारा ॥ कोण० ॥१॥
समर्थ-सेवक निर्भय त्याला
कोण वक्र पाही
प्रतिपादिल हे कोण तुम्हाविण
देउनिया ग्वाही
आम्ही दुर्बल आम्हास द्या हो
तुमच्या आधारा ॥ कोण०॥२॥
नाठाळासी नमस्कारिता
अनुभव विपरीत
उद्धत दिसता व्हावे उद्धट
हीच योग्य रीत
जशास तैसे हाच न्याय जगि
दुर्जन संहारा ॥कोण० ॥३॥
पापपुण्य समतेने लाभे
दुर्लभ नरदेह
सार्थकि लाविल तोच धुरंधर
यात न संदेह
दर्शन तुमचे घडता मानव
जिंकिल भवसमरा ॥ कोण० ॥४॥
त्वरा करा हो समर्थ सद्गुरु
वाट किती पाहू
अनन्य बालक आम्ही कैसे
तुम्हाविना राहू
असह्य आता पोरकेपणा
घ्या हो कैवारा ॥कोण० ॥५॥

Tuesday, 21 October 2014

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१।।
आईका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ।।ध्रु .।।
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें ।।२।।
तुका म्हणे देहाचे अवयव ।
सुख दु:ख जीव भोग पावे ।।३।।
हजारों वर्षांपासून समाजातील उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यादि भेद मिटवण्यासाठी सर्व संत, समाजसुधारक, पुढारी इ. विचारवंतांचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. पण हिंदू या सहिष्णू, सर्वसमावेशक धर्माचे यथाविधी पालन करणारे आपण हिंदू विचारवंतांच्या या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद देत आहोत ? खचितच बिलकूल नाही. जातीजातींमध्येच होणारे रोटी-बेटीचे व्यवहार हेच सत्य उघड करतात की आजही आपण त्या सर्वत्र समान रुपाने व्यापलेल्या ईशतत्वाला न समजता केवळ वरचा भेदच पाहण्याचीच हुशारी मिळवली आणि जोपासली आहे. आजही दुसऱ्या जातींविषयी मत्सर, आपल्याच जातीच्या लोकांना मतदान करणं, इतर जातीत मुलगी देताना पालकांचे धाबे दणाणणे, इतर जातीचा म्हणून गुरूच्या ठिकाणीही भेद पाहणे इ. घटना घडतच आहेत. पण संत काय म्हणतात, त्याकडे आपले लक्ष आहे का ? चला पाहू तर संत तुकोबा यावर काय म्हणतात.

"सर्व कणाकणांत विष्णूच वास करत आहे, हाच आम्हां वैष्णवांचा धर्म आहे. मूळात विष्णू या नावाचा अर्थच आहे की कणाकणांत वास करणारा तो. म्हणूनच भेदाभेद आम्हाला अमंगळ, त्याज्य झाले. माझ्या हृदयातला विष्णू तो खरा आणि तुमच्या हृदयातला विष्णूही तोच. मग भेदाला जागा उरतेच कुठे ? वरवरची मायिक भिन्नता तर भ्रम आहे. अंतरीची एकरुपता हीच शाश्वत आहे. विश्वास नाही बसत तर भागवत, उपनिषद, गीता, वेद चाळून पहा आणि या शाश्वत सत्यावर विश्वास ठेऊन आपलेच हित करून घ्या. त्वरा करा. अहो, देहादेहात असा ईश्वर व्यापून असता त्याची पूजा करावयास कुठे दूर जावयास नको. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका, त्याच्या ठिकाणी भेद ठेऊ नका, मग झालीच की ती सर्वेश्वराची पूजा. आपण सारे एकाच देहाचे अवयव आहोत. त्या परब्रह्माच्या विराट रुपाचे अंग आहोत. सर्वांना सुख-दुःख सारखीच आहेत. मी सुखात आनंदतो, तसेच तुम्हीही सुखात आनंदतात, मी दुःखात रडतो, तसेच तुम्हीही दुःखात रडतात. मग भेद तो कसला ? हे समजून इतरांचे अश्रू पूसा, इतरांना सुख वाटा, ईश्वराची ओळख करून द्या, वैदिक धर्माची ओळख करून द्या. हीच त्या सर्वेश्वराची पूजा आहे."

असे असताना आपण केवळ जातीवरून एखाद्या व्यक्तिला उच्च-नीच लेखणे, जात पाहून रोटीबेटीचे व्यवहार करणे, जात पाहून मतदान करणे, जात पाहून गुणगौरव करणे इ. सर्व भेदात्मक क्रिया त्या सर्वेश्वराची पूजा होतात की अपमान हे तुम्हीच तुमच्या मनाशी ठरवा आणि तसे वागा. देवाने सर्वांना कर्माचे स्वातंत्र्य दिले आहे.